आता आपण आपल्या मूळ विषयाकडे वळूया. तुम्हालाही कदाचित प्रश्न पडला असेल, की हे महाजन साहेब विषय सोडून आपल्याला कुठे घेऊन गेले! पण खरं सांगायचं तर, एखादी घटना समजून घ्यायची असेल, तर कधी कधी भूतकाळात काही पावले मागे जावे लागते. कारण त्या भूतकाळाच्या वाटेवरून गेल्याशिवाय त्या विषयाचा खरा अर्थ उलगडत नाही आणि त्याचा मधुर रस चाखण्यातही खरी मजा येत नाही.
नाट्यमय प्रसंग सांगायचा झाला, तर गुजराती माध्यमातून शिकलेली दोन मुलं अचानक मराठी माध्यमाच्या दारात उभी होती. ती मुलं म्हणजे मी आणि माझा भाऊ चंदन.
आम्ही अहमदाबादमध्ये असतानाही घरात बहुतांशी गुजराती भाषेत बोलायचो. मराठी समजत होती. अस्खलितपणे बोलता येत नसली, तरी थोडीफार बोलता येत होती. शेवटी, मराठी ही आमची मायबोली होती. वडिलांनी गावातील श्री. रा. आ. महाजन माध्यमिक विद्यालयात आमचा प्रवेश निश्चित केला.
शहरातील वातावरणात शिकलेली आम्ही दोघं भावंडं आणि आता खेडेगावातील एका छोट्या शाळेत शिकायचं, ही कल्पनाच मनात थोडी धाकधूक निर्माण करणारी होती. अंगावर काटा आल्यासारखं वाटत होतं. पण गावातील शाळेत गेल्याशिवाय दुसरा पर्यायही नव्हता.
तुम्हाला सांगतो, मित्रांनो, शाळेच्या पहिल्याच दिवशी मी तिच्या प्रवेशद्वाराजवळ जाऊन थांबलो आणि शाळेकडे पाहू लागलो. त्या वेळी शाळा माझ्यासमोर उभी होती; पण तिचं खरं रूप, तिच्या अस्तित्वामागची कहाणी आणि तिच्या भविष्यात दडलेली शक्यता मला तेव्हा उमगली नव्हती.
आज मात्र, जेव्हा मी भूतकाळात परत जातो आणि शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ उभा राहतो, तेव्हा माझ्या डोळ्यांसमोर एक वेगळंच चित्र उभं राहतं. मला माझी शाळा दिसते, तारुण्यात पदार्पण केलेल्या एका रुबाबदार तरुणासारखी! त्याचं मुखमंडल जणू तेजस्वी सूर्यासारखं. मान ताठ आणि उंच. डोळे मोठे, जणू त्यांत उज्ज्वल भविष्याची स्वप्नं सामावलेली. छाती भरदार. कमरेवर रुबाबाने ठेवलेले दोन हात आणि जमिनीत घट्ट रोवलेले पाय!
हे चित्र पाहताना मला आठवतो तो रावणाच्या सभेत आपला पाय जमिनीत रोवून उभा असलेला अंगद!
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, की या महाजन साहेबांनी आपल्या शाळेची तुलना थेट रावणाच्या सभेत उभ्या असलेल्या अंगदाशी का केली असावी?
सांगतो, ऐका! चला, तुम्हाला घेऊन जातो थेट भूतकाळात—त्रेतायुगात, श्रीरामाच्या युगात आणि तेही थेट लंकेच्या रावणाच्या महासभेत.
त्या महासभेत शांतिदूत म्हणून आलेला अंगद उभा होता. त्याच्यासमोर उंच सिंहासनावर अहंकाराने माखलेला दशानन रावण आरूढ झाला होता. त्याचा रुबाब, त्याची सत्ता आणि त्याचं सामर्थ्य पाहून देवतांनाही असहायतेची जाणीव होत होती, असं वर्णन रामायणाच्या कथेत आढळतं.
नऊ ग्रह त्याच्या पायाशी होते. बाजूला युवराज मेघनाथ, अर्थात इंद्रजित. त्याच्यासोबत प्रहस्त, अतिकाय, अकंपन, महोदर, महापार्श्व, कुंभ आणि निकुंभ हे दोन भाऊ, वज्रदंष्ट्र, धूम्राक्ष, नरान्तक, देवान्तक, त्रिशिरा आणि विरूपाक्ष असे बलाढ्य योद्धे. याशिवाय राजसभेत उपस्थित असलेले मंत्री, नातेवाईक आणि सल्लागार!
अशा बलाढ्य सभेत अंगद मात्र एकटाच उभा होता. ना हातात शस्त्र, ना चेहऱ्यावर भीती. त्याने आपला पाय जमिनीत घट्ट रोवला होता. समोर रावणाचं सामर्थ्य, त्याच्या बाजूला बलाढ्य योद्धे आणि त्यांच्या मध्ये निर्धाराने उभा असलेला अंगद!
एका बाजूला अफाट सामर्थ्य, तर दुसऱ्या बाजूला अढळ निर्धार!
मित्रांनो, आता आपल्या अंगदासारख्या शाळेकडे वळूया. ज्या काळात या शाळेची सुरुवात झाली, त्या काळात तिच्यासमोर अडचणींचे डोंगर उभे राहिले नसतील का? वर उल्लेख केलेल्या राक्षसांप्रमाणेच एकापेक्षा एक मोठ्या समस्या तिच्या वाटेत आल्या नसतील का? एक समस्या सोडवावी, तर दुसरी समोर उभी राहावी; दुसरीचा मार्ग काढावा, तर तिसरीने डोकं वर काढावं! त्या संघर्षाची तीव्रता आज आपण केवळ कल्पनेतूनच जाणू शकतो.
१९९१ मध्ये गावात शाळा असली पाहिजे, असा विचार मनात येणं आणि त्या विचाराला प्रत्यक्षात उतरवणं, हे मुळीच सोपं काम नव्हतं. केवळ इच्छा असून चालत नाही; त्या इच्छेला कृतीची जोड द्यावी लागते, अडचणींचा सामना करावा लागतो आणि ध्येयापासून विचलित न होता पुढे चालत राहावं लागतं.
हेच आव्हान स्वीकारून गावात ज्ञानाचा सेतू उभारण्याचं महत्त्वपूर्ण कार्य स्वर्गीय श्री. राजाराम आनंदा महाजन साहेब यांनी आणि त्यांच्या सोबत असलेल्या गावातील माजी विद्यार्थ्यांनी करून दाखवलं.
या कार्यासाठी त्यांच्यासमोर अनेक अडचणी उभ्या राहिल्या असतील. गावातील लोकांमध्ये शाळेबद्दल जागरूकता निर्माण करणं, शाळेसाठी परवानगी मिळवणं, सरकारी मान्यता मिळवणं, निधी जमा करणं, शाळेसाठी जागा उपलब्ध करणं, आवश्यक साहित्याची व्यवस्था करणं, विद्यार्थी मिळवणं, योग्य शिक्षकांची निवड करणं, शिक्षकांचं मानधन किंवा पगार देणं आणि संस्था टिकवून ठेवणं—अशा कितीतरी जबाबदाऱ्या त्यांच्यासमोर असतील.
प्रत्येक जबाबदारीसोबत एक नवं आव्हान उभं राहत असेल. प्रत्येक अडचणीवर मात करण्यासाठी प्रयत्न करावे लागत असतील. पण या सगळ्या संघर्षांमध्ये त्यांच्या डोळ्यांसमोर एकच ध्येय होतं.
गावातील मुलं-मुलींनी शिकावं, मोठं व्हावं आणि शिक्षणासाठी दररोज आठ किलोमीटर येण्या-जाण्याचा प्रवास करावा लागू नये.
गावातच शाळा असेल, तर मुलांना शिक्षणाची संधी मिळेल. त्यांना पुढे जाण्याचा मार्ग खुला होईल. आज उभारला जाणारा हा ज्ञानाचा सेतू उद्या कित्येक पिढ्यांना शिक्षणाच्या वाटेवरून पुढे घेऊन जाईल. या सेतूवरून चालत मुलं-मुली आपापल्या आयुष्याचा मार्ग शोधतील, शिक्षण घेतील आणि आपल्या गावाचं नाव मोठं करतील.
हेच ते स्वप्न! हेच ते ध्येय!
आणि या ध्येयाच्या बळावर अंगदासारखी आपली शाळा जमिनीत पाय घट्ट रोवून उभी राहू लागली.
आज त्या शाळेच्या प्रवेशद्वारासमोर उभं राहिलं, तर तिचं रूप डोळ्यांसमोर उभं राहतं.
समोर दिसायचं लोखंडी, मोठं प्रवेशद्वार. त्या वेशद्वारमधून आत प्रवेश केल्यावर दोन्ही बाजूंना फुलांनी आणि झाडांनी बहरलेले दोन बगीचे दिसायचे. त्या बगिच्यांमध्ये जाण्यासाठी बोगनवेलींच्या कमानीसारखी प्रवेशद्वारं होती. त्या बोगनवेलींपैकी एक आजही तिथे उभी आहे. काळ पुढे सरकला, अनेक गोष्टी बदलल्या; पण त्या बोगनवेलीचं तिथे आजही असलेलं अस्तित्व भूतकाळाशी जोडणारा एक धागाच जणू!
त्या बगिच्यांच्या पुढे होतं मोठं पटांगण. आणि त्यानंतर नजरेसमोर यायची शाळेची इमारत.
इमारत फार मोठी नव्हती. चार वर्गखोल्या, मुख्याध्यापकांचं एक कार्यालय आणि बाजूला शाळेचं ऑफिस—एवढीच तिची रचना. आजच्या मोठमोठ्या शाळांच्या तुलनेत ती साधी होती; पण तिच्या साधेपणाकडे पाहताना तिच्या उभारणीमागचा विचार आणि तिचं महत्त्व विसरून चालणार नाही.
अशा या शाळेत माझा प्रवेश झाला होता.
आणि या शाळेच्या रथाचे सारथी होते आदरणीय मुख्याध्यापक श्री. गोपाल लक्ष्मण पाटील सर.
जशी आमची शाळा, तसेच आमचे मुख्याध्यापक—तरुण, उत्साही आणि मोठी जबाबदारी पेलणारे! त्या वेळी त्यांचं वय अवघं २३ वर्षं होतं. म्हणजे अगदी तारुण्यात पदार्पण केलेलं वय.
जशी रामायणातील अंगदावर शांतिदूत म्हणून लंकेत जाण्याची आणि रावणाच्या महासभेत ठामपणे उभं राहण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती, तशीच एका नव्याने उभ्या राहणाऱ्या शाळेची धुरा शाळेच्या संचालक मंडळाने गोपाल लक्ष्मण पाटील सरांच्या खांद्यावर सोपवली होती.
वय लहान, पण जबाबदारी मोठी! समोर अनेक आव्हानं, पण डोळ्यात एक ध्येय!
आणि अश्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या या शाळेच्या प्रवासात माझाही प्रवेश झाला होता. त्या वेळी मला या शाळेच्या भविष्यातील वाटचालीची, तिच्यासमोर उभ्या राहणाऱ्या आव्हानांची किंवा तिच्या उभारणीमागच्या संघर्षाची पूर्ण जाणीव नव्हती. मी केवळ एका शाळेत प्रवेश घेतला होता; पण काळाच्या ओघात त्या शाळेशी जोडल्या जाणाऱ्या आठवणी, अनुभव आणि माणसं माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनणार होती.
Share This Post
या ब्लॉगची संकल्पना
एक विचार, एक संवाद हे केवळ साहित्यलेखनाचे व्यासपीठ नसून, विचारांच्या देवाणघेवाणीतून आत्मचिंतन आणि परिवर्तनाची दिशा शोधण्याचा हा माझा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.
साहित्याच्या माध्यमातून जीवन, समाज, संस्कार आणि मानवी मूल्यांचा शोध घेत वाचक-रसिकाला स्वतंत्रपणे विचार करण्यास प्रवृत्त करणे, हा या व्यासपीठाचा प्रमुख उद्देश आहे.
कारण, विचार व्यक्तीपासून सुरू होतो, संवादातून समृद्ध होतो आणि कृतीतून परिवर्तन घडवू शकतो, हा माझा विश्वास आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा