महाभारताच्या वनपर्वात पांडवांच्या वनवासातील अनेक प्रसंगांचे वर्णन आढळते. याच वनपर्वात यक्ष आणि युधिष्ठिर यांच्यात झालेला संवाद मानवी जीवनाचा एक विलक्षण पैलू उलगडून दाखवतो. हा केवळ प्रश्नोत्तरांचा प्रसंग नाही, तर मानवी अस्तित्वाचा अर्थ शोधणारा आणि माणसाला स्वतःच्या जगण्याकडे नव्याने पाहण्यास प्रवृत्त करणारा एक गहन संवाद आहे. या संवादामागे एक विलक्षण घटना घडली होती.
पांडवांना मिळालेल्या बारा वर्षांच्या वनवासाचा काळ संपत आला होता. वनातील भ्रमंती, संघर्ष आणि अनेक अनुभवांनी त्यांचे जीवन व्यापलेले होते. एके दिवशी जंगलातून प्रवास करताना पांडव आणि द्रौपदी अत्यंत थकले होते. तहानेने व्याकूळ झालेल्या सर्वांना पाण्याची आवश्यकता होती. युधिष्ठिराने नकुलला पाण्याचा शोध घेण्यासाठी पाठवले. बराच वेळ झाला, तरी नकुल परतला नाही. म्हणून युधिष्ठिराने सहदेवाला त्याच्या शोधार्थ पाठवले. बराच वेळ सहदेवही परतला नाही, तेव्हा अर्जुन निघाला. अर्जुनाचाही पत्ता लागला नाही, म्हणून अखेरीस भीम त्या दिशेने गेला. मात्र, या चौघांपैकी कोणीही परतले नाही.
शेवटी युधिष्ठिर स्वतः भावांचा शोध घेत निघाला. काही अंतरावर त्याला एक सुंदर, स्वच्छ सरोवर दिसले. त्या सरोवराच्या काठावर पोहोचताच त्याच्या नजरेसमोर जे दृश्य आले, त्याने त्याला स्तब्ध केले. त्याचे चारही भाऊ सरोवराच्या काठावर निश्चल अवस्थेत पडले होते. त्यांच्या शरीरावर कोणत्याही जखमेच्या खुणा नव्हत्या. जणू काही गाढ निद्रेत असावेत, असे ते दिसत होते. आपल्या प्रिय भावांची ती अवस्था पाहून युधिष्ठिर शोकाकुल झाला. मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. एवढे पराक्रमी योद्धे कोणत्या शक्तीसमोर असहाय झाले असतील?
भावांच्या मृतवत अवस्थेमागे काहीतरी असामान्य कारण असल्याची जाणीव त्याला झाली. तो सरोवरातील पाणी पिण्यास पुढे सरसावला, तेवढ्यात एक अदृश्य आवाज घुमला.
“थांब, युधिष्ठिर! या सरोवराचे पाणी पिण्यापूर्वी तुला माझ्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. तुझ्या भावांनी माझी आज्ञा न मानता पाणी पिण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना त्याची किंमत मोजावी लागली.”
युधिष्ठिराने त्या अदृश्य शक्तीला प्रश्न विचारला, “तू कोण आहेस? माझ्या भावांची ही अवस्था तू केलीस का?”
तेव्हा यक्ष प्रकट झाला. त्याने आपल्या प्रश्नांची उत्तरे दिल्यास युधिष्ठिराला पाणी पिण्याची परवानगी देण्याचे सांगितले. युधिष्ठिरानेही कोणाच्याही अधिकाराचा भंग न करता, यक्षाच्या प्रश्नांना उत्तरे देण्याची तयारी दर्शवली.
आणि मग सुरू झाला तो विलक्षण प्रश्नोत्तरांचा प्रसंग…
यक्षाने युधिष्ठिराला जीवन, सुख, धर्म, सत्य, मानवी स्वभाव आणि जगण्याच्या अर्थाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले. प्रत्येक प्रश्नामागे एक गहन विचार होता आणि प्रत्येक उत्तरातून मानवी जीवनाचा एक नवा पैलू उलगडत होता.
यक्षाने विचारले,
“जगातील सर्वांत मोठे आश्चर्य कोणते?”
युधिष्ठिराने उत्तर दिले,
“दररोज असंख्य जीव मृत्यूच्या अधीन होऊन निघून जातात. तरीही उरलेले लोक आपण कायमस्वरूपी जगणार आहोत, अशा इच्छेने जगतात. यापेक्षा मोठे आश्चर्य कोणते?”
या उत्तरात मानवी जीवनाचे एक विलक्षण सत्य सामावलेले आहे. मृत्यू हा प्रत्येकाच्या आयुष्याचा अटळ शेवट असताना, माणूस मात्र उद्याच्या असंख्य स्वप्नांत रमलेला असतो. त्याला जगायचे असते, मिळवायचे असते, जिंकायचे असते आणि स्वतःचे अस्तित्व सिद्ध करायचे असते. पण या सगळ्या धावपळीत आपण नेमके कशासाठी जगत आहोत, हा प्रश्न अनेकदा मागे पडतो.
यक्षाने आणखी एक प्रश्न विचारला,
“खऱ्या अर्थाने सुखी कोण?”
युधिष्ठिराने सांगितले, जो आपल्या घरी साधे अन्न शिजवून खातो, कोणाचाही ऋणी नसतो आणि ज्याला परदेशी भटकण्याची वेळ येत नाही, तो खऱ्या अर्थाने सुखी असतो.
या उत्तरातून सुखाची एक वेगळी व्याख्या समोर येते. सुख म्हणजे केवळ संपत्ती, प्रतिष्ठा किंवा मोठमोठ्या यशाची प्राप्ती नव्हे. आपल्या परिस्थितीत समाधान अनुभवता येणे, स्वाभिमानाने जगता येणे आणि मनावर अनावश्यक ओझे नसणे, यांतही सुख सामावलेले असते.
यक्षाचा आणखी एक प्रश्न होता,
“योग्य मार्ग कोणता?”
युधिष्ठिराने उत्तर दिले, तर्काला निश्चित आधार नसतो, धर्मग्रंथांमध्ये मतभेद असतात, प्रत्येक ऋषीचे मत वेगळे असते आणि धर्माचे सत्य गूढ असते. त्यामुळे महान व्यक्तींनी आपल्या आचरणातून दाखवलेला मार्ग हाच योग्य मार्ग असतो.
या उत्तरातून एक महत्त्वाची शिकवण मिळते. जीवनात योग्य आणि अयोग्य यांचा निर्णय केवळ शब्दांवर, उपदेशांवर किंवा विचारांवर होत नाही. माणसाचे आचरण, त्याची कृती आणि त्याने इतरांशी केलेला व्यवहार यांतून त्याच्या विचारांची खरी ओळख होते.
यक्ष आणि युधिष्ठिराचा हा संवाद वाचताना जाणवते की, जीवनाचे सार मोठमोठ्या तत्त्वज्ञानातच दडलेले नसते. ते आपल्या रोजच्या जगण्यात, छोट्या निर्णयांत, माणसांशी असलेल्या नात्यांत आणि आपण स्वीकारलेल्या मूल्यांतही सामावलेले असते.
माणूस जन्माला येतो तेव्हा त्याच्याकडे अनुभव नसतात, विचारांची परिपक्वता नसते आणि जीवनाची दिशा स्पष्ट झालेली नसते. तो हळूहळू घडत जातो. कुटुंब त्याला संस्कार देते, शिक्षक विचारांची दिशा देतात, समाज त्याला वास्तवाची जाणीव करून देतो आणि अनुभव त्याला स्वतःच्या चुका ओळखायला शिकवतात. काही माणसे आयुष्यात येऊन आपल्याला आधार देतात, काही संघर्ष आपल्याला सक्षम करतात, तर काही अपयश आपल्याला स्वतःची नव्याने ओळख करून देतात.
या सगळ्यांतून माणूस केवळ जगायला शिकत नाही, तर जगण्याची जबाबदारीही शिकतो. आपल्या कृतींचा इतरांवर होणारा परिणाम समजतो. स्वतःच्या यशाबरोबर इतरांच्या योगदानाची जाणीव ठेवायला शिकतो. आपल्याला मिळालेल्या ज्ञानाचा, अनुभवाचा आणि संस्कारांचा उपयोग केवळ स्वतःपुरता न करता इतरांच्या जीवनातही सकारात्मक योगदान देण्यासाठी करता येतो, हे त्याला समजू लागते.
कदाचित जीवनाचा खरा अर्थ हाच असावा. आपण किती मोठे झालो, किती मिळवले किंवा किती प्रसिद्ध झालो, यापेक्षा आपण माणूस म्हणून किती समृद्ध झालो, किती संवेदनशील राहिलो आणि आपल्या जगण्यामुळे इतरांच्या आयुष्यात किती चांगुलपणा निर्माण झाला, याला अधिक महत्त्व असावे.
मात्र, या सगळ्या विचारांनंतर एक प्रश्न मनात उभा राहतो.
आपल्याला मिळालेल्या या आयुष्याचा आपण नेमका काय उपयोग केला?
केवळ स्वतःसाठी जगण्यातच आयुष्य संपवले, की आपल्या अस्तित्वातून कोणाच्या तरी जीवनात आशेचा, ज्ञानाचा, प्रेमाचा किंवा चांगुलपणाचा एखादा दिवा पेटवला?
आणि जेव्हा कधीतरी मागे वळून पाहण्याची वेळ येईल, तेव्हा आपल्या आयुष्याची ओळख आपल्या मिळवलेल्या यशाने होईल, की आपण घडवलेल्या माणसांनी, जपलेल्या नात्यांनी आणि आपल्या जगण्यातून दिलेल्या संस्कारांनी?
या प्रश्नांची उत्तरे प्रत्येकाला स्वतःच्या आयुष्यात शोधावी लागतात.
माझ्या आयुष्याकडे मागे वळून पाहताना मला जाणवते की, मी जे काही आहे, ते एका दिवसात घडलेले नाही. अनेक माणसांच्या सहवासातून, असंख्य अनुभवांतून, संस्कारांतून आणि आयुष्याने दिलेल्या शिकवणीतून मी हळूहळू घडत गेलो.
हा त्याच प्रवासाचा प्रामाणिक मागोवा…
मी घडत गेलो…


ब्लॉग वाचा

“एका सामान्य विद्यार्थ्याची जीवनगाथा”

आत्मकथनात्मक लेखमाला | नऊ पर्वांतून उलगडलेला जीवनप्रवास

मी घडत गेलो… ही केवळ आठवणींची मालिका नाही, तर बालपणापासून आजवरच्या जीवनप्रवासातून घडत गेलेल्या व्यक्तिमत्त्वाची प्रामाणिक कहाणी आहे. संघर्ष, अपयश, स्वप्ने, गुरुजनांचे मार्गदर्शन आणि आयुष्याला दिशा देणाऱ्या अनुभवांतून उलगडत गेलेली ही जडणघडण आहे. या प्रवासात लाभलेले संस्कार, नात्यांचे ऋण आणि कौतुकातून जागृत झालेली लेखनाची प्रेरणा शब्दांत मांडण्याचा हा एक मनापासून केलेला प्रयत्न आहे. मागे वळून पाहताना जाणवते की, माणूस केवळ स्वतःच्या प्रयत्नांनी घडत नाही, तर त्याच्या आयुष्यात भेटलेल्या माणसांच्या प्रेमाने, मार्गदर्शनाने आणि विश्वासानेही घडत जातो.

ब्लॉग वाचा

Share This Post

ब्लॉग वाचा

प्रतिक्रिया व्यक्त करा

एक विचार, एक संवाद हे केवळ साहित्यलेखनाचे व्यासपीठ नसून, विचारांच्या देवाणघेवाणीतून आत्मचिंतन आणि परिवर्तनाची दिशा शोधण्याचा हा माझा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.

साहित्याच्या माध्यमातून जीवन, समाज, संस्कार आणि मानवी मूल्यांचा शोध घेत वाचक-रसिकाला स्वतंत्रपणे विचार करण्यास प्रवृत्त करणे, हा या व्यासपीठाचा प्रमुख उद्देश आहे.

कारण, विचार व्यक्तीपासून सुरू होतो, संवादातून समृद्ध होतो आणि कृतीतून परिवर्तन घडवू शकतो, हा माझा विश्वास आहे.