
शब्दांच्या वाटेवरून… शब्दांच्या पलीकडे जाणारा एक विचार…
काही प्रश्नांची उत्तरे पुस्तकांत सापडतात, काही अनुभवांतून मिळतात; आणि काही प्रश्न मात्र मनात कायमचे राहतात.
अशाच प्रश्नांचा शोध घेत, त्यांच्याशी संवाद साधत आणि त्या संवादातून काही विचार मांडण्याचा माझा हा प्रयत्न आहे.
मी उजास एकनाथ महाजन.
या व्यासपीठावर मी सर्व वाचक-रसिकांचे मनःपूर्वक स्वागत करतो. माझ्या साहित्यलेखनातील जे काही चांगले आणि स्वीकारार्ह वाटेल, त्याचा आपण अवश्य स्वीकार करावा. लेखनात कुठे उणिवा जाणवल्यास, त्या सुधारण्याची संधी मला द्यावी, ही आपणास नम्र विनंती आहे.
चित्रकला हे माझे पहिले प्रेम. चित्रकलेची आवड विद्यार्थी दशेपासूनच जोपासत, मी प्रथम चोपडा येथील ललित कला केंद्रात आणि त्यानंतर पुण्यातील प्रसिद्ध अभिनव कला महाविद्यालयात कलेचे शिक्षण घेतले. पेन्सिल आणि विविध रंगांच्या पेनांच्या साहाय्याने ग्रामीण जीवन, तेथील समाज, स्त्री-पुरुष आणि बालकांचे जीवन रेखाटण्यात मला विशेष रस होता. मानवी जीवनातील विविध छटा आणि त्यांतील भावविश्व चित्रांतून टिपण्याची ही आवड माझ्या कलाप्रवासाचा महत्त्वाचा भाग राहिली.
२००५ नंतर माझा प्रवास 2D ॲनिमेशनच्या क्षेत्राकडे वळला. पुढे बहुराष्ट्रीय कंपनीत डिझायनर म्हणून काम करण्यापर्यंतची माझी वाटचाल आजतागायत सुरू आहे. चित्रकलेच्या माध्यमातून अभिव्यक्त होण्याची आवड जपत असतानाच, त्या पहिल्या प्रेमाला आणखी एक बहार आली, ती मराठी लेखन, चिंतन आणि विचारमंथनाच्या रूपाने. ही क्षेत्रेही माझ्या मनाच्या जवळची आहेत.
एखादा अनुभव मनाला स्पर्शून जातो, एखादी घटना विचार करायला भाग पाडते किंवा एखादी साधीशी गोष्ट समाजाकडे पाहण्याची नवी दृष्टी देते, तेव्हा त्या विचारांना शब्दरूप देण्याची इच्छा निर्माण होते. अशा अनुभवांतून आणि निरीक्षणांतून आकार घेणारे विचार लेखनातून मांडण्याचा माझा प्रयत्न असतो.
माझ्या लेखनाचा केंद्रबिंदू समाजातील माणूस आणि त्याचे जगणे हा आहे.
माणूस कसा घडतो? त्याच्या विचारांना आकार कोण देतं? संस्कारांचा त्याच्या व्यक्तिमत्त्वावर किती परिणाम होतो? आपल्या छोट्या-छोट्या कृतींचा समाजावर काय परिणाम होतो? आणि सर्वांत महत्त्वाचं, आपण ज्या समाजाची अपेक्षा करतो, त्या समाजाच्या निर्मितीत आपली स्वतःची भूमिका काय आहे?
या प्रश्नांचा शोध घेताना मला जाणवतं की, समाजातील मोठे प्रश्न अनेकदा आपल्या रोजच्या छोट्या वर्तनात दडलेले असतात. एखादे फूल तोडण्यापासून ते सार्वजनिक मालमत्तेची काळजी न घेण्यापर्यंत, मुलांना दिलेल्या संस्कारांपासून ते स्वतःच्या जबाबदाऱ्या टाळण्यापर्यंत, अशा छोट्या-छोट्या कृतींमधून समाजाचा चेहरा घडत असतो.
म्हणूनच माझ्या लेखनात समाज, संस्कार, व्यक्तिमत्त्व, नातेसंबंध, शिक्षण, वेळ, संवेदना, जबाबदारी आणि राष्ट्रनिर्माण यांसारखे विषय विविध अंगांनी समोर येतात.
लेखन ही एक अद्भुत कला आहे; पण साहित्यिक कलावंत केवळ वाचकाचे मनोरंजन करण्यासाठी लिहितो का? निश्चितच नाही! मानवी जीवनाचा शोध घेणे, वास्तवाचे विविध पैलू उलगडणे, मानवी मूल्यांची जपणूक करणे आणि सामाजिक सत्याचे मर्मस्पर्शी शब्दचित्र रेखाटणे, यांद्वारे वाचकाचा विवेक जागृत करणे, त्याला आत्मपरीक्षणास प्रवृत्त करणे, तसेच हास्यविनोदातून जीवनाचा आनंद खुलवणे, हेच साहित्यलेखनाचे खरे सामर्थ्य असायला हवे, नाही का?
मात्र, माझा प्रयत्न कोणालाही उपदेश करण्याचा नाही. प्रश्न उपस्थित करणे, वाचकाला विचार करण्यास प्रवृत्त करणे आणि एखाद्या विषयाकडे नव्या दृष्टिकोनातून पाहण्याची संधी देणे, ही माझ्या लेखनामागील भूमिका आहे.
याच भूमिकेतून साकारले आहे, ‘एक विचार, एक संवाद’.
हे केवळ साहित्यलेखनाचे व्यासपीठ नाही, तर विचारांची देवाणघेवाण घडवून आणण्याचा माझा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. साहित्य, समाज, संस्कार, मानवी मूल्ये आणि जीवनातील विविध अनुभव यांकडे चिकित्सक व संवेदनशील दृष्टिकोनातून पाहणे, त्यांतून निर्माण होणारे विचार शब्दबद्ध करणे आणि वाचकाला स्वतंत्रपणे विचार करण्यास प्रवृत्त करणे, हा या व्यासपीठाचा प्रमुख उद्देश आहे.
या व्यासपीठावर मी माझे मराठी आणि हिंदी साहित्यलेखन वाचक-रसिकांसमोर मांडणार आहे. वाचकांनी केवळ लेखनाचा आनंद घ्यावा, असे नव्हे; तर त्यातील विचारांशी संवाद साधावा, स्वतःच्या भूमिकेचे आत्मपरीक्षण करावे आणि समाजाकडे पाहण्याची आपली दृष्टी अधिक व्यापक करावी, अशी माझी अपेक्षा आहे.
आज माहितीच्या वेगापेक्षा विचारांच्या खोलीची गरज अधिक आहे, असे मला वाटते. आपल्या भोवती तयार झालेल्या मर्यादित विचारांच्या चौकटींतून बाहेर पडून स्वतःकडे आणि समाजाकडे अधिक व्यापक दृष्टिकोनातून पाहण्याची गरज आहे. एखादा लेख वाचल्यानंतर वाचकाच्या मनात प्रश्न निर्माण झाला, एखादी जुनी समजूत नव्याने तपासावीशी वाटली किंवा एखाद्या विषयाकडे पाहण्याची दृष्टी अधिक व्यापक झाली, तर त्या लेखनाचा उद्देश साध्य झाला, असे मला वाटते.
“व्यक्तीपासून राष्ट्रनिर्माण”
‘व्यक्तीपासून राष्ट्रनिर्माण’ ही संकल्पना माझ्या व्यापक वैचारिक प्रवासाचा महत्त्वाचा भाग आहे.
राष्ट्रनिर्माण ही केवळ शासनाची, व्यवस्थेची किंवा संस्थांची जबाबदारी नाही. त्याची सुरुवात आपल्या घरातून, आपल्या संस्कारांतून, आपल्या विचारांतून आणि आपल्या कृतींतून होते. चांगला समाज घडवायचा असेल, तर व्यक्तीच्या जडणघडणीकडे लक्ष द्यावे लागते. कारण व्यक्ती घडते ती विचारांनी, संस्कारांनी आणि जाणीवपूर्वक केलेल्या कृतींनी.
माझ्या लेखनात साहित्यिकता असावी; पण त्याहून अधिक जगण्याशी जोडलेला विचार असावा, अशी माझी इच्छा आहे. माझे शब्द वाचकाला केवळ आवडावेत असे नाही; त्यांनी त्याला थोडावेळ थांबवावे, स्वतःच्या आत डोकावायला भाग पाडावे आणि कदाचित स्वतःशीच एखादा संवाद सुरू करावा.
कारण, विचार व्यक्तीपासून सुरू होतो, संवादातून समृद्ध होतो आणि कृतीतून परिवर्तन घडवू शकतो, हा माझा विश्वास आहे.
शब्द संपतात, पण विचार संपत नाहीत.
विचारातून प्रश्न जन्माला येतात,
प्रश्नांतून संवाद सुरू होतो,
आणि संवादातून बदलाची सुरुवात होते.
याच विश्वासातून माझा हा लेखनप्रवास…
एक विचार, एक संवाद.
— उजास एकनाथ महाजन

