मला शाळेत येण्याचं जेवढं कुतूहल होतं, त्यापेक्षा कदाचित अधिक कुतूहल शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षकांच्या मनात असावं. ते का, हेही सांगतो.
गुजराती माध्यमातून शिकलेले आणि मराठी भाषेचा फारसा सराव नसलेले दोन विद्यार्थी जेव्हा नववीच्या वर्गात प्रवेश घेतात, तेव्हा त्यांच्या भाषिक क्षमतेविषयी शिक्षकांच्या मनात प्रश्न निर्माण होणं स्वाभाविकच होतं. त्यांना मराठी समजेल का? ते मराठी वाचू शकतील का? लिहिता येईल का? आणि नववीच्या अभ्यासक्रमातील विषय त्यांना समजतील का? असे अनेक प्रश्न त्यांच्या मनात उभे राहिले असतील.
मात्र, ही परिस्थिती सर्वाधिक चिंताजनक असणार होती ती मराठीचे शिक्षक, आदरणीय दिलीप सोनावणे सर यांच्यासाठी.
ज्या वर्गात विद्यार्थ्यांना नववीच्या अभ्यासक्रमानुसार शिकवायचं आहे, त्याच वर्गातील एखाद्या विद्यार्थ्याला जर बाराखडीपासून सुरुवात करून मराठी वाचायला आणि लिहायला शिकवावं लागणार असेल, तर शिक्षकांसमोरचं आव्हान किती मोठं असेल! एका बाजूला वर्गाचा अभ्यासक्रम पूर्ण करण्याची जबाबदारी आणि दुसऱ्या बाजूला विद्यार्थ्याला भाषेच्या प्राथमिक ज्ञानापासून शिकवण्याची गरज, अशा परिस्थितीत चिंता वाटणं साहजिकच होतं.
शाळेच्या पहिल्या दिवशी मी वर्गात जाऊन बसलो. माझं नशीब बघा, बसायला जागा मिळाली ती थेट पहिल्याच बाकावर! आता माझी परिस्थिती कशी झाली असेल, हे सांगण्यासाठी हिंदीतील एक म्हण अगदी चपखल बसते, आसमान से गिरे और खजूर में अटके!
शाळा सुरू होऊन बरेच दिवस झाले होते; माझा प्रवेश मात्र थोडा उशिरा झाला होता. त्यामुळे वर्गातील मुलं-मुली एकमेकांशी परिचित झाली होती. त्यांच्या दृष्टीने मी एक नवीन विद्यार्थी होतो, तर माझ्यासाठी तो संपूर्ण वर्गच नवीन होता.
नेमका त्याच दिवशी मराठी विषयाची दहा गुणांची चाचणी होती.
दिलीप सोनावणे सर वर्गात आले. सर्व विद्यार्थी उभे राहिले आणि एकाच आवाजात म्हणाले, “एक साथ जय हिंद!”
हे पाहून मीसुद्धा पटकन उभा राहिलो आणि म्हणालो, “एक साथ जय हिंद!”
पण मला हे समजून घेऊन म्हणायला थोडा उशीर झाला होता. त्यामुळे माझा आवाज सर्वांत शेवटी ऐकू आला. वर्गातील सगळी मुलं-मुली माझ्याकडे पाहू लागली. क्षणभर मला आपण काहीतरी चुकल्यासारखं वाटलं. सोनावणे सरांनीही माझ्याकडे एक कटाक्ष टाकला.
सरांनी सर्वांना बसायला सांगितलं आणि आम्ही आपापल्या जागेवर बसलो.
शाळेतील तो माझा पहिलाच दिवस होता. त्यामुळे वर्गातील कोणाचीच मला नीट ओळख नव्हती. माझ्या दोन चुलत बहिणी आणि आमच्या गल्लीत राहणारी, माझ्याच वर्गात शिकणारी काही मुलं एवढीच माझी ओळख होती. बाकीचे विद्यार्थी तर दूरच; समोर उभे असलेले सोनावणे सरसुद्धा माझ्यासाठी पूर्णपणे अनोळखी होते.
सोनावणे सर साधारण चोवीस-पंचवीस वर्षांचे असावेत. उंच, सडपातळ शरीरयष्टी, सावळा वर्ण आणि रुबाबदार चेहरा. अंगावर लालसर-तपकिरी रंगाचा चौकडीचा शर्ट, त्याला साजेशी गडद तपकिरी पँट, कमरेला काळ्या रंगाचा पट्टा आणि पायात काळे बूट. शर्ट व्यवस्थित इनशर्ट केलेला. त्यांच्या एकूण व्यक्तिमत्त्वात तरुणपणाचा सहज रुबाब जाणवत होता.
अशा या सोनावणे सरांनी फळ्यावर काही प्रश्न लिहिले आणि दहा गुणांची चाचणी सुरू झाली.
मात्र, या सगळ्या प्रकाराचा मला काहीच अंदाज नव्हता. वर्गात एकदम शांतता पसरली होती. सगळे विद्यार्थी आपापल्या प्रश्नपत्रिकेत गुंतले होते. मी मात्र कधी खाली मान घालून पाहत होतो, तर कधी वर मान करून वर्गाकडे नजर टाकत होतो. कधी इकडे, तर कधी तिकडे. नेमकं काय करावं, हेच मला समजत नव्हतं.
तेवढ्यात सरांनी फळ्यावर एक शब्द लिहिला आणि मला उद्देशून म्हणाले, “उठ! हे काय लिहिलं आहे, ते वाच.”
मी उठून उभा राहिलो.
मित्रांनो, मी उभा राहिलो आणि कदाचित त्याच क्षणी सरांच्या मनातील चिंतेचा पहिला टप्पा संपला असावा. कारण त्यांनी मराठीत सांगितलेली सूचना मला समजली होती आणि त्यानुसार मी उभाही राहिलो होतो. म्हणजे मराठी बोललेलं मला समजतं, एवढा तरी विश्वास त्यांच्या मनात निर्माण झाला असावा, असं मला वाटतं.
म्हणजे काय, सरांची ३५ टक्के चिंता मिटली असेल!
पण खरी परीक्षा तर अजून बाकी होती.
सरांनी फळ्यावर लिहिलेला शब्द होता—‘इयत्ता’!
इतर विद्यार्थ्यांच्या दृष्टीने हा शब्द वाचणं कदाचित अगदी सोपं होतं. पण माझ्यासाठी तो तितकासा सोपा नव्हता. मराठी भाषेतील त्या शब्दाची मला पुरेशी सवय नव्हती. सरांनी जणू त्या एका शब्दाच्या माध्यमातून माझी छोटीशी परीक्षा घेतली होती.
मी तो शब्द वाचला—“इयत्ता!”
सरांच्या मनातील चिंतेचा आणखी एक भाग कमी झाला असावा. मराठीत बोललेलं समजतं आणि फळ्यावर लिहिलेला शब्दही वाचता येतो, हे त्यांच्या लक्षात आलं असेल. त्यांनी पुन्हा सुटकेचा निःश्वास टाकला असेल. आधी ३५ टक्के चिंता कमी झाली आणि आता आणखी ३५ टक्के! म्हणजे एकूण ७० टक्के चिंता दूर झाली असावी. उरलेल्या ३० टक्क्यांचं काय, ते मात्र पुढचा अनुभवच सांगणार होता!
मित्रांनो, खरं सांगायचं तर, ‘इयत्ता’ हा शब्द वाचण्यापासून माझ्या खऱ्या शालेय प्रवासाला सुरुवात झाली. तो क्षण मी कधीच विसरू शकणार नाही.
दिलीप सोनावणे सर हे माझ्या आयुष्यातील पहिले शिक्षक आणि पहिले वर्गशिक्षक. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख केवळ त्यांच्या बाह्य रूपात नव्हती; ती त्यांच्या शिकवण्याच्या पद्धतीत होती.
सोनावणे सर शिकवताना एखाद्या वाक्याचा अर्थ सांगून थांबत नसत. त्या वाक्यातील शब्दांचा नेमका अर्थ काय, त्यांची रचना कशी आहे, त्यातून कोणता भाव व्यक्त होतो आणि त्यामागे कोणतं मर्म दडलेलं आहे, हे ते विद्यार्थ्यांना समजावून सांगत असत. एखाद्या वाक्याचं साहित्यिक सौंदर्य उलगडताना त्यातील रूपकाचा अर्थही ते सोप्या आणि सरळ भाषेत स्पष्ट करत.
त्यांच्या शिकवण्याची खासियत अशी होती, की साहित्यिक भाषेतील अवघड आशयही विद्यार्थ्यांना समजेल अशा पद्धतीने ते मांडत. व्याकरणातील नियम असोत किंवा एखाद्या वाक्यातून व्यक्त होणारा सूक्ष्म भावार्थ, ते त्याचा अर्थ विद्यार्थ्यांच्या मनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत. शब्दांचा केवळ वरवरचा अर्थ समजून घेणं आणि त्या शब्दांमागचा विचार जाणून घेणं, यातला फरक त्यांच्या शिकवण्यातून जाणवत असे.
एखादा शब्द वाचता येणं ही भाषेशी झालेली पहिली ओळख असते; पण त्या शब्दाचा अर्थ समजून घेणं, त्यातील भाव जाणणं आणि त्यामागचं साहित्यिक मर्म उलगडणं, हा त्या ओळखीचा पुढचा प्रवास असतो. सोनावणे सरांची शिकवण्याची पद्धत या प्रवासाला दिशा देणारी होती.
माझ्यासारख्या गुजराती माध्यमातून आलेल्या विद्यार्थ्यासाठी मराठी भाषा समजून घेण्याच्या दृष्टीने अशी शिकवण्याची पद्धत महत्त्वाची होती. भाषेची भीती कमी होऊन तिच्याशी जवळीक निर्माण होण्यासाठी केवळ शब्दांची ओळख पुरेशी नसते; त्या शब्दांमधून व्यक्त होणारा आशय समजून घेणंही तितकंच आवश्यक असतं.
सोनावणे सरांनी मला अक्षरांशी ओळख करून दिली, भाषेचा अर्थ समजून घेण्याची दिशा दाखवली आणि मराठी भाषेविषयी अस्मिता, आवड व आपुलकी निर्माण होण्याच्या प्रवासात महत्त्वाची भूमिका बजावली.
अशा शिक्षकांप्रती माझ्याकडून अन्याय झाला होता, असं आज मला वाटतं.
तो अन्याय नेमका काय होता? माझ्यासारख्या विद्यार्थ्याला शिकवणाऱ्या या शिक्षकाबाबत मी असं का म्हणतो आहे? आणि त्यांच्या शिकवण्याच्या पद्धतीचा माझ्या आयुष्यावर नेमका काय परिणाम झाला?
हे सगळं तुम्हाला पुढे समजेलच. मात्र, पुढील घटना वाचल्यानंतर मी जे सांगतो आहे, ते योग्य की अयोग्य, हे ठरवण्याचा अधिकार मी तुमच्यावर सोपवतो. कारण एखाद्या व्यक्तीविषयी मत बनवण्याआधी तिच्या आयुष्यातील घटना आणि त्यामागची परिस्थिती समजून घेणं आवश्यक असतं. माझ्या या आठवणींच्या बाबतीतही तेच लागू होतं.
हळूहळू शाळेचा पहिला दिवस पुढे सरकत गेला. एक तासिका संपली, दुसरी सुरू झाली. नवनवीन शिक्षकांची ओळख होत गेली. काहींची ओळख करून घेण्याची, तर काहींना स्वतःची ओळख करून देण्याची वेळ येत गेली.
आणि या सगळ्या नव्या अनुभवांमधून माझ्या शालेय जीवनाचा प्रवास हळूहळू पुढे सरकू लागला.
Share This Post
या ब्लॉगची संकल्पना
एक विचार, एक संवाद हे केवळ साहित्यलेखनाचे व्यासपीठ नसून, विचारांच्या देवाणघेवाणीतून आत्मचिंतन आणि परिवर्तनाची दिशा शोधण्याचा हा माझा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.
साहित्याच्या माध्यमातून जीवन, समाज, संस्कार आणि मानवी मूल्यांचा शोध घेत वाचक-रसिकाला स्वतंत्रपणे विचार करण्यास प्रवृत्त करणे, हा या व्यासपीठाचा प्रमुख उद्देश आहे.
कारण, विचार व्यक्तीपासून सुरू होतो, संवादातून समृद्ध होतो आणि कृतीतून परिवर्तन घडवू शकतो, हा माझा विश्वास आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा