वरच्या सर्व पर्वांमधून मी जे काही शब्दरूपात मांडण्याचा प्रयत्न केला आहे, तो शब्दांचा अतिरेक नाही, अतिशयोक्ती नाही किंवा त्यात कुठलाही मिरची-मसाला मिसळलेला नाही. या लेखनातून मला कोणतेही श्रेय मिळवायचे नाही. माझ्या मनात ज्या भावना आहेत, ज्या आठवणी आहेत आणि जे अनुभव आहेत, तेच मी तुमच्यासमोर मांडले आहेत. हे सर्व सांगताना मला मोठेपणा वाटत नाही किंवा कमीपणाही वाटत नाही. कारण जे काही लिहिले आहे, ते माझ्या अनुभवातून आलेले आणि माझ्या मनाला सत्य वाटलेले आहे.
भगवद्गीतेतील एक प्रसिद्ध श्लोक आहे,
“कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।”
अर्थात, आपला अधिकार केवळ कर्म करण्यावर आहे, त्याच्या फळावर नाही. मी आजवर माझ्या परीने कर्म करत आलो आहे. त्याच्या फळाची अपेक्षा कधी केली नाही आणि आजही नाही. मात्र, या प्रवासाकडे मागे वळून पाहताना माझ्या आयुष्यावर सर्वाधिक प्रभाव टाकणाऱ्या तीन व्यक्तींची नावे आवर्जून घ्यावीशी वाटतात. माझे वडील, आमचे हेड सर, आदरणीय मुख्याध्यापक श्री. गोपाल लक्ष्मण पाटील सर आणि माझे पहिले वर्गशिक्षक, आदरणीय श्री. दिलीप सोनवणे सर.
या दोघांनीही माझ्यातील काही गुण ओळखले, त्यांना प्रोत्साहन दिले आणि नकळत माझ्या आयुष्याला एक दिशा दिली. कदाचित त्या वेळी त्यांच्या कौतुकाचे मोल मला पूर्णपणे समजले नसेल; पण आज आयुष्याच्या या टप्प्यावर उभा राहून मागे पाहताना त्यांच्या शब्दांची ताकद आणि त्यांनी केलेल्या संस्कारांचे महत्त्व प्रकर्षाने जाणवते.
मित्रांनो, शिक्षक जेव्हा एखाद्या चांगल्या गुणाचे निरीक्षण करून चारचौघांत तुमचे कौतुक करतात, तेव्हा त्या कौतुकाकडे केवळ प्रशंसेचे दोन शब्द म्हणून पाहू नका. अनेकदा त्या कौतुकातून शिक्षक तुमच्यावर एक अनामिक जबाबदारी सोपवत असतात. तुमच्यातील क्षमता त्यांनी ओळखलेली असते आणि त्या क्षमतेचा उपयोग तुम्ही योग्य दिशेने करावा, अशी त्यांची अपेक्षा असते. ही जाणीव आपल्याला झाली, तर आपल्या पुढील वाटचालीला नवी दिशा मिळू शकते.
हेड सरांनी माझे केलेले कौतुकही मी अशाच एका जबाबदारीच्या रूपात स्वीकारले आहे. लेखनाच्या माध्यमातून समाजासाठी काहीतरी करण्याची जबाबदारी. माझ्या शब्दांचा उपयोग केवळ स्वतःच्या अभिव्यक्तीसाठी न करता, त्यातून एखादा विचार रुजावा, एखाद्याला आत्मपरीक्षणाची प्रेरणा मिळावी आणि समाजाला काहीतरी सकारात्मक योगदान देता यावे, यासाठी मला प्रयत्न करायचे आहेत.
मला ही जबाबदारी पार पाडावीच लागेल. कारण जेव्हा कधी मी पुन्हा सरांसमोर उभा राहीन, तेव्हा मला अभिमानाने सांगता आले पाहिजे की, तुमचा हा विद्यार्थी “सिर्फ़ दिखने में अच्छा और चलने में ढब्बू” राहिलेला नाही, तर आयुष्यातील अनुभवांतून शिकत, स्वतःला घडवत तो आज एक जबाबदार नागरिक बनण्याचा प्रयत्न करत आहे.
माझ्या आयुष्याच्या प्रवासाकडे आज मागे वळून पाहताना, माझ्या वडिलांनी घेतलेल्या त्या धाडसी निर्णयाचे फलित मला स्पष्टपणे दिसते. त्यांचा तो निर्णय चुकीचा नव्हता, हे आजच्या माझ्या वाटचालीतून मला जाणवते. त्यांनी आयुष्यभर कष्ट केले, अपार मेहनत घेतली आणि आजही वयाच्या ९५व्या वर्षी त्यांच्यात कष्ट करण्याची जिद्द कायम आहे.
ते नेहमी एक गोष्ट सांगतात,
“आपल्या हातात फक्त कष्ट करणे इतकेच आहे. यश-अपयश हे देव योग्य वेळ आल्यावर देतो.”
त्यांच्या या साध्या शब्दांत मला आयुष्याचा मोठा अर्थ सामावलेला दिसतो. कष्ट करत राहणे, परिस्थितीसमोर हार न मानणे आणि परिणामाची अनावश्यक चिंता न करता आपले कर्म प्रामाणिकपणे करत राहणे, हाच त्यांनी मला दिलेला जीवनमंत्र आहे. हाच विचार मी आजवर जपण्याचा प्रयत्न केला आहे आणि यापुढेही तोच विचार घेऊन माझी वाटचाल सुरू ठेवणार आहे.
माझ्या आयुष्याकडे मागे वळून पाहताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे माझ्या वडिलांच्या व्यक्तिमत्त्वाची छाप माझ्या स्वभावावरही उमटलेली आहे. त्यांच्याप्रमाणेच मलाही फारसे बोलणे आवडत नाही. बोलण्यापेक्षा कामावर अधिक लक्ष केंद्रित करणे, परिस्थिती कोणतीही असली तरी शांतपणे आपले काम करत राहणे, कष्टांवर विश्वास ठेवणे आणि मनात सकारात्मक विचारांची साथ कायम ठेवणे, हे गुण माझ्याही स्वभावाचा अविभाज्य भाग बनले आहेत. हे गुण मी जाणीवपूर्वक आत्मसात केले की वडिलांच्या सहवासातून नकळत माझ्यात उतरले, हे सांगता येणार नाही. मात्र, आज स्वतःकडे पाहताना जाणवते की त्यांच्या शांत, कष्टाळू आणि सकारात्मक व्यक्तिमत्त्वाचा वारसा माझ्या जगण्यातही कुठेतरी जिवंत आहे. कदाचित, हीच वडिलांकडून मला मिळालेली सर्वांत मौल्यवान देणगी असावी.
आज या लेखनप्रवासाचा शेवट करताना मनात अनेक आठवणी दाटून येत आहेत. शाळेच्या त्या पहिल्या दिवसापासून ते ३२ वर्षांनंतर गुरुजनांसमोर पुन्हा उभे राहण्यापर्यंतचा हा प्रवास केवळ माझ्या आयुष्यातील घटनांचा आलेख नाही. तो माझ्यावर झालेल्या संस्कारांचा, मला मिळालेल्या मार्गदर्शनाचा, अनुभवांतून झालेल्या जडणघडणीचा आणि माणसांशी जोडल्या गेलेल्या नात्यांचा प्रवास आहे.
या प्रवासात मला घडवणारे माझे गुरुजन, मला आधार देणारे माझे वडील, माझ्यासोबत चालणारे मित्र आणि आयुष्यात भेटलेली प्रत्येक व्यक्ती यांच्याप्रती माझ्या मनात कृतज्ञतेची भावना आहे.
शेवटी एवढेच सांगावेसे वाटते की, आयुष्यात आपण किती मोठे झालो, यापेक्षा आपल्याला घडवणाऱ्या माणसांच्या शिकवणीचा किती प्रामाणिकपणे उपयोग केला, हे अधिक महत्त्वाचे असते. कारण माणूस आयुष्यात पुढे जात असतो, पण त्याच्या पायाभरणीत योगदान देणारी माणसे आणि त्यांनी दिलेले संस्कार कायम त्याच्यासोबत असतात.
माझ्या या लेखनातून त्या संस्कारांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.
धन्यवाद!
उजास एकनाथ महाजन
एक विचार, एक संवाद
दिनांक : १२ ऑक्टोबर ते ०८ नोव्हेंबर २०२६


प्रतिक्रिया व्यक्त करा