आयुष्य जितकं सरळ वाटतं, तितकं ते सरळ नसतं, याची प्रचीती बहुतेक सर्वांनाच कधी ना कधी आलेली असते. आपण आपल्याच विश्वात रमलेले असतो. आयुष्याचा प्रवास ठरलेल्या वाटेने सुरळीत सुरू आहे, असं वाटत असतानाच अचानक एखादं अनपेक्षित वळण येतं आणि पुढचा सगळा प्रवासच बदलून जातो. त्या वळणावर आपली इच्छा असो वा नसो, आपल्याला नव्या वाटेने चालावंच लागतं. अशा वेळी “जे होते ते सर्व काही चांगल्यासाठीच होते” या भगवद्गीतेतील विचाराचा आधार आपण घेतो. पण त्या विचारामागचं गूढ समजून घेण्याइतकी समज प्रत्येक वेळी आपल्याकडे असतेच असं नाही. आपणही त्या अर्जुनासारखे असतो, ज्याला संसाररूपी कुरुक्षेत्रात उभं राहिल्यावरच गीतेच्या ज्ञानाची खरी गरज जाणवते.
आणि तसाच काहीसा मीही माझ्या आयुष्याच्या कुरुक्षेत्रात, शालेय शिक्षण घेत असताना, अशा एका टप्प्यावर येऊन थांबलो, जिथे समोर ‘नो एंट्री’ चा फलक होता आणि बाजूला दिशा दाखवणारा एक बाण! पुढे जायचं होतं, पण नेमकं कुठल्या दिशेने जायचं, हे ठरवण्याचं स्वातंत्र्य नव्हतं. समोर आलेली परिस्थिती स्वीकारण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. या सगळ्याची सुरुवात झाली ती अहमदाबादमधील आमच्या आयुष्यात घडलेल्या एका अनपेक्षित घटनेने…
त्या वेळी मी, माझे दोन भाऊ, आई आणि वडील असे आम्ही सर्वजण अहमदाबादला राहत होतो. वडील ज्या कापड गिरणीत काम करत होते, ती अचानक बंद पडली. ज्या नोकरीच्या आधारावर आमच्या कुटुंबाचा संसार सुरू होता, तो आधारच एका क्षणात नाहीसा झाला.
माझ्या वडिलांचे व्यक्तिमत्त्व साधे, शांत आणि शिस्तप्रिय होते. साधारण १५६ सेंटीमीटर उंची, सावळा वर्ण आणि भारदस्त शरीरयष्टी, असा त्यांचा बांधा होता. अहमदाबादमध्ये असताना त्यांची वेशभूषा साधारणपणे पँट-शर्ट अशीच असायची. स्वतःला नीटनेटके ठेवणे आणि व्यायाम करणे त्यांना आवडायचे. ते फारसे बोलत नसत, मात्र आपल्या कामावर अधिक लक्ष केंद्रित करायचे. कापड गिरणीत काम करणारे वडील सायकलवरून तर कधी पायी कामाला जात असत. त्यांचे ते साधे, कष्टमय जीवन आजही माझ्या स्मरणात आहे. कधी कधी त्यांच्या ओठांवर एखादे शास्त्रीय गाणे गुणगुणताना ऐकायला मिळायचे. दिलीप कुमार हे त्यांचे आवडते अभिनेते होते. लहानपणी त्यांच्याकडे पाहताना कधी कधी मला ते राजेश खन्नासारखे दिसायचे. त्यांना अधूनमधून रागही यायचा, पण तो फार काळ टिकत नसे. शांत स्वभाव, कामावरील निष्ठा आणि साधेपणा यांतूनच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख होत असे.
गिरणी बंद पडल्याने आई-वडिलांसमोर जणू अंधारच पसरला. आता पुढे काय करायचं? पुन्हा कुठून सुरुवात करावी? या प्रश्नांची उत्तरं त्यांच्याकडेही नव्हती. आयुष्याने एका क्षणात असा प्रश्न समोर ठेवला होता, ज्याचं उत्तर शोधणं गरजेचं होतं; पण सुरुवात नेमकी कुठून करायची, हेच कळत नव्हतं. त्या वेळी मात्र आम्हाला कृष्णरूपी मार्गदर्शक सापडला नाही.
आणि आम्ही? आम्ही तेव्हा बालक होतो, अबोध होतो. हातातलं काम सुटणं म्हणजे काय आणि त्याचे परिणाम किती दूरवर जाऊ शकतात, याची आम्हाला कुठून जाणीव असणार? आमच्यासाठी तर जग म्हणजे शाळा, खेळ आणि बालपणाच्या निरागस गोष्टी! घरात मोठ्यांच्या मनात किती चिंता दाटून आली असेल, याची आम्हाला कल्पनाही नव्हती. मोठ्यांच्या जगात पोटापाण्याचे प्रश्न असतात, उद्याची काळजी असते; आमच्या बालविश्वात मात्र या प्रश्नांना अजून प्रवेशच मिळाला नव्हता.
अशा परिस्थितीत वडिलांनी अखेर एक धाडसी निर्णय घेतला—गावाकडे परत जायचं आणि शेती करायची.
पण हा निर्णय घेणं त्यांच्यासाठी तितकं सोपं नव्हतं. आमची थोडी शेती होती. आणि शेती होती तरी कुठे? तर तब्बल ६०० किलोमीटर दूर, महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात, जामनेर तालुक्यातील हिवरखेडे बुद्रुक या आमच्या मूळ गावी! जवळपास चाळीस वर्षं शहरात घालवल्यानंतर गावाकडे परतायचं, शहरातील आयुष्य मागे सोडायचं आणि शेतीच्या आधारावर नव्याने संसार उभा करायचा, ही साधी गोष्ट नव्हती. पण परिस्थितीने आता वेगळाच मार्ग समोर आणला होता. आणि हाच एक पर्याय वडिलांसमोर होता.
अहमदाबादमध्ये बहुतांश लोक आपल्या वडिलांना ‘बापू’ म्हणत… आम्हीही कधी कधी प्रेमाने त्यांना ‘बापू’ म्हणायचो. त्यांना शेतीची प्रचंड आवड होती. आयुष्याच्या सुरुवातीची जवळपास वीस वर्षं त्यांनी शेतीतच घालवली होती. कदाचित याच अनुभवाच्या बळावर त्यांनी हा निर्णय घेतला असावा. मात्र, त्यांच्या मनात नेमकं काय चाललं होतं, याची आम्हाला कल्पनाही नव्हती. आज त्यांच्या जागी मी किंवा आणखी कोणी असतो, तर कदाचित हा निर्णय घेतलाच नसता. पण वडिलांनी मात्र परिस्थितीपुढे हार न मानता नव्याने सुरुवात करण्याचं धाडस दाखवलं. त्यांच्या मनातली जिद्द, निर्णयामागचा आत्मविश्वास आणि त्यासाठी लागणारं धैर्य किती मोठं होतं, याची जाणीव आज मागे वळून पाहताना होते.
शेवटी शहरातील घर विकून आम्ही साधारण एप्रिल १९९४ मध्ये गावाकडे आलो. कडक उन्हाळ्याचे दिवस होते आणि अवघ्या दोन महिन्यांनंतर शेतीच्या पेरणीला सुरुवात होणार होती. गावात पोहोचल्यापासूनच वडिलांनी शेतातील कामाला सुरुवात केली. गावाकडे आल्यानंतर त्यांच्या वेशभूषेतही बदल झाला. पांढरा पायजमा, कुर्ता आणि डोक्यावर गांधी टोपी, हा त्यांचा नेहमीचा पेहराव बनला. एका शेतकऱ्याच्या रूपात नव्याने जगण्याचा बदल त्यांनी स्वीकारला होता. हे सगळं घडत असताना त्यांच्या मनात नेमकं काय चाललं असेल, याची कल्पना कोणालाच नव्हती.
गावातील अनेक लोक आणि नातेवाईक मात्र वडिलांच्या या निर्णयाबद्दल साशंक होते. “गावाला कशाला आले? तिकडेच काहीतरी उद्योग केला असता,” असं ते म्हणायचे. त्यांच्या बोलण्यातून वडिलांनी घेतलेल्या निर्णयाबद्दलची काळजी आणि नाराजी, दोन्ही जाणवायची. पण शहरात राहून, स्वतःच्या बळावर कुटुंबाचा उदरनिर्वाह करणं किती अवघड असू शकतं, याची त्यांनाही पूर्ण कल्पना नव्हती. परिस्थितीचा सामना करण्यासाठी वडिलांनी निवडलेला मार्ग त्यांना योग्य वाटत नव्हता.
वडिलांनी मात्र गावाकडे येण्याचा निर्णय केवळ घेतला नाही, तर तो प्रत्यक्षात उतरवून दाखवला. त्यांच्यासमोर अडचणी होत्या, साधनांची कमतरता होती आणि नव्याने उभं राहण्याचं आव्हानही होतं; तरी त्यांनी हार मानली नाही. आज मागे वळून पाहताना त्यांच्या या निर्णयाचा आणि त्यांनी केलेल्या संघर्षाचा आम्हाला मनापासून अभिमान वाटतो.
वडिलांच्या आयुष्याचा विचार केला की एखाद्या पुस्तकातील नायकाची आठवण होते. फरक एवढाच की पुस्तकातील नायकाची कथा लेखक लिहितो; पण वडिलांनी आपल्या आयुष्याची कथा स्वतःच्या कष्टांनी आणि जिद्दीने घडवली. त्यांच्या जीवनाचा प्रवास इतका खडतर आणि प्रेरणादायी आहे की, त्यावर एक पुस्तक लिहावं, असं मनापासून वाटतं.


प्रतिक्रिया व्यक्त करा