आदरणीय सोनावणे सर,
आपणांस मनःपूर्वक अभिष्टचिंतन! 🙏

आज सकाळी जेव्हा मी आकाशाकडे पाहिले, तेव्हा ते निरभ्र दिसले. सूर्य नेहमीप्रमाणेच उगवला होता—त्याच तेजाने, त्याच प्रखरतेने आणि त्याच निःस्वार्थ भावनेने संपूर्ण विश्वाला प्रकाश देत.
पण आज त्या उगवत्या सूर्याकडे पाहताना मनात एक वेगळाच विचार आला…
जणू एखादा मावळता सूर्य आपल्या अस्तित्वाची, प्रकाशाची आणि जबाबदारीची मशाल उगवत्या सूर्याच्या हाती सोपवताना सांगत होता—

“आता हे सारे विश्वच तुझे,
तूच त्याचा माय-बाप…
तुझ्यातली धगधगती मशाल
ज्ञानाचा सूर्य होऊन तळपू दे;
तुझ्यातून जन्मणाऱ्या प्रत्येक ताऱ्याला
पुन्हा सूर्य होण्याची वाट मिळू दे…
तुझ्या अस्ताची सांजही
उद्याच्या सूर्यांची पहाट ठरू दे…

हाच निर्धार मनाशी बाळगून रा. आ. महाजन माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापकपदाची धुरा हाती घेताना, मावळत्या ज्ञानसूर्याने उगवत्या ज्ञानसूर्याच्या हाती सोपवलेली ही ज्ञानाची मशाल आपण समर्थपणे पुढे न्याल, याची मनापासून खात्री वाटते.
आपल्या ज्ञानमंदिराची, आपल्या मुला-मुलींची, आपल्या विद्यार्थ्यांची आणि त्यांच्यातून घडणाऱ्या आपल्या गावाच्या उज्ज्वल भविष्याची वाटचाल अधिक प्रकाशमान व्हावी, या नव्या प्रवासाची जबाबदारी आज आपण स्वीकारत आहात.
आणि या क्षणी माझ्यासाठी हा प्रसंग केवळ एका मुख्याध्यापकाच्या पदग्रहणाचा नाही; तो माझ्यासारख्या एका विद्यार्थ्याच्या मनात वर्षानुवर्षे जपलेल्या गुरुऋणाला शब्द देण्याचा क्षण आहे.

आपल्या सर्वांचे लाडके आणि माझे आदरणीय सोनावणे सर, ज्यांनी मला मराठी शिकवली, ज्यांनी माझ्या मनात मराठी भाषेविषयीची अस्मिता रुजवली आणि आज मी हे जे काही तोडक्या-मोडक्या शब्दांत लिहित आहे, त्या शब्दांना दिशा देणाऱ्या माझ्या लेखणीच्या मुळाशी ज्यांची शिकवण आहे.

ते माझे पहिले वर्गशिक्षक, माझे मराठीचे शिक्षक.

“इयत्ता” या एका शब्दापासून सुरू झालेल्या माझ्या शालेय प्रवासाचे खरे शिल्पकार म्हणजे आदरणीय सोनावणे सर.
त्या वेळी कदाचित आपल्या शिकवणीचे मोल पूर्णपणे जाणवले नसेल; पण काळ पुढे गेला, शाळा मागे राहिली, वर्ग बदलले, वह्या-पुस्तके बंद झाली… तरी आपल्या शिकवणीचे काही शब्द मनात तसेच राहिले. आज मागे वळून पाहताना जाणवते की, त्या शब्दांनी केवळ एका विषयाची ओळख करून दिली नव्हती; त्यांनी भाषेशी नाते जोडले, विचारांना दिशा दिली आणि मनात मराठीची अस्मिता रुजवली.

आज आपण आपल्या आयुष्यातील एक अत्यंत महत्त्वाचे पद आणि त्यासोबत येणारी तितकीच मोठी जबाबदारी स्वीकारत आहात. ही जबाबदारी जरी गोवर्धनासारखी विशाल असली, तरी आपल्याविषयी आम्हा सर्वांच्या मनात असलेला विश्वास त्याहून मोठा आहे. आपण ही ज्ञानाची धुरा आपल्या अनुभवाने, विवेकाने आणि मायेने समर्थपणे पेलाल, याची खात्री आहे.
आपल्या या नव्या प्रवासासाठी माता सरस्वती आपल्या ज्ञानाची, विवेकाची आणि कर्तृत्वाची ज्योत अधिक तेजस्वी ठेवो; आपल्या हाती आशीर्वादरूपी कृपाप्रसाद देवो, हीच तिच्या चरणी मनःपूर्वक प्रार्थना.

पुन्हा एकदा, आदरणीय सोनावणे सर,
आपणांस मुख्याध्यापकपदाच्या नव्या जबाबदारीसाठी मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन!

आपल्या या नव्या भूमिकेकडे पाहताना माझ्या मनात एकच भावना आहे.
ज्यांनी माझ्या शालेय आयुष्याच्या पहिल्या पानावर “इयत्ता” हा शब्द लिहिला, तेच आज माझ्या शाळेच्या भविष्याच्या पुढच्या अध्यायाची सुरुवात करत आहेत.

यापेक्षा एका विद्यार्थ्याच्या मनाला अभिमान देणारा आणि गुरुऋणाची जाणीव करून देणारा क्षण आणखी कोणता असू शकतो?

Share This Post

प्रतिक्रिया व्यक्त करा

एक विचार, एक संवाद हे केवळ साहित्यलेखनाचे व्यासपीठ नसून, विचारांच्या देवाणघेवाणीतून आत्मचिंतन आणि परिवर्तनाची दिशा शोधण्याचा हा माझा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.

साहित्याच्या माध्यमातून जीवन, समाज, संस्कार आणि मानवी मूल्यांचा शोध घेत वाचक-रसिकाला स्वतंत्रपणे विचार करण्यास प्रवृत्त करणे, हा या व्यासपीठाचा प्रमुख उद्देश आहे.

कारण, विचार व्यक्तीपासून सुरू होतो, संवादातून समृद्ध होतो आणि कृतीतून परिवर्तन घडवू शकतो, हा माझा विश्वास आहे.

Is this your new site? Log in to activate admin features and dismiss this message
लॉगीन