आदरणीय हेड सर,
(जी. एल. पाटील सर)

आपणास मनःपूर्वक अभिवादन…

शिक्षक कधीच निवृत्त होत नाही…

शिक्षक कधीच निवृत्त होत नाही आणि होऊही शकत नाही.

तुम्ही कधी ऐकले आहे का, सूर्य आपल्या प्रकाशदानाच्या कार्यातून मुक्त झाला आहे? चंद्राने आपल्या शीतलतेचा वर्षाव करणे कधी थांबवले आहे? एखाद्या वृक्षाने फुले, फळे आणि सावली देण्याची आपली सेवा कधी थांबवली आहे? नदीने आपले गोड, अमृतासमान जल वाहवणे कधी थांबवले आहे?

नाही.

कारण देणे हा त्यांच्या अस्तित्वाचा स्वभाव आहे.

अगदी त्याचप्रमाणे, ज्ञानाने समृद्ध आणि अनुभवाने परिपूर्ण असलेला शिक्षक ज्ञानदानाच्या सेवेतून कधीच मुक्त होऊ शकत नाही. त्याच्या ज्ञानाला निवृत्ती नसते; त्याच्या संस्कारांना विराम नसतो आणि विद्यार्थ्यांच्या जीवनात त्याने प्रज्वलित केलेल्या विचारांच्या ज्योतीला अस्त नसतो.

शिक्षक हा केवळ एका विद्यार्थ्याच्या जीवनाचा नव्हे, तर संपूर्ण समाजाच्या जडणघडणीचा कणा असतो. कोणीही जन्मतः डॉक्टर, इंजिनिअर, वकील, अधिकारी, शास्त्रज्ञ, राजकीय पुढारी किंवा शिक्षक होऊन जन्माला येत नाही. प्रत्येकाला घडावे लागते; आणि त्या घडण्याच्या प्रक्रियेला विचारांची दिशा, ज्ञानाची शिदोरी आणि संस्कारांची बैठक देणारा हात म्हणजे शिक्षकाचा हात.

शिक्षक स्वतः एक ज्ञानरूपी महाग्रंथ असतो. त्या महाग्रंथातून घडणारे असंख्य विद्यार्थी म्हणजे ज्ञानाने, विचारांनी, संस्कारांनी आणि मार्गदर्शनाने समृद्ध झालेली जिवंत पुस्तके असतात. काळ पुढे सरकतो, पिढ्या बदलतात; पण त्या पुस्तकांतील ज्ञान आणि संस्कार पुढे प्रवाहित होत राहतात. त्याच पुस्तकांमधून पुन्हा काहीजण तुमच्यासारखेच ज्ञानरूपी महाग्रंथ बनतात आणि पुढील पिढीच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश प्रज्वलित करतात. अशा रीतीने ज्ञानाची ही परंपरा, संस्कारांचा हा वारसा आणि विचारांचा हा प्रकाश एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे निरंतर प्रवाहित होत राहतो. हे चक्र कालही सुरू होते, आजही सुरू आहे आणि उद्याही असेच अविरत सुरू राहणार आहे.

मनुष्य ज्ञान घेऊन जन्माला येत नाही; पण ज्ञानाच्या प्रकाशाने समृद्ध होऊन जीवन जगू शकतो आणि ज्ञानी होऊन या जगाचा निरोप घेऊ शकतो. एखाद्या शिक्षकाच्या जीवनकार्याची यापेक्षा मोठी सार्थकता आणखी कोणती असू शकते?

म्हणूनच शिक्षकासाठी ‘निवृत्ती’ हा केवळ सेवाकाळाचा शब्द असू शकतो; ज्ञानदानाच्या धर्माचा नाही.
माझ्या जीवनाला खरा अर्थ देणारे शिक्षक, गुरु आणि मार्गदर्शक म्हणून आपल्या प्रदीर्घ ज्ञानसेवेच्या कार्याला मनःपूर्वक अभिवादन!

आपण दिलेल्या ज्ञानाचा आणि संस्कारांचा ठसा आपल्या विद्यार्थ्यांच्या जीवनावर सदैव उमटत राहो. आपल्या हातून असेच असंख्य विद्यार्थी घडत राहोत आणि आपल्या ज्ञानाची ज्योत एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे अखंड तेवत राहो.

माता सरस्वती आपणास उदंड, निरामय आणि अर्थपूर्ण आयुष्य प्रदान करो, हीच निर्मळ भावना आणि मनःपूर्वक शुभेच्छा आपल्या चरणी अर्पण करतो.

Share This Post

प्रतिक्रिया व्यक्त करा

एक विचार, एक संवाद हे केवळ साहित्यलेखनाचे व्यासपीठ नसून, विचारांच्या देवाणघेवाणीतून आत्मचिंतन आणि परिवर्तनाची दिशा शोधण्याचा हा माझा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.

साहित्याच्या माध्यमातून जीवन, समाज, संस्कार आणि मानवी मूल्यांचा शोध घेत वाचक-रसिकाला स्वतंत्रपणे विचार करण्यास प्रवृत्त करणे, हा या व्यासपीठाचा प्रमुख उद्देश आहे.

कारण, विचार व्यक्तीपासून सुरू होतो, संवादातून समृद्ध होतो आणि कृतीतून परिवर्तन घडवू शकतो, हा माझा विश्वास आहे.

Is this your new site? Log in to activate admin features and dismiss this message
लॉगीन