मला लिहिण्याची आवड आहेच. मी नेहमी काही ना काही लिहित असतो, माझे विचार शब्दांतून मांडत असतो. माझ्या लिखाणातून हेड सरांना नेमके काय जाणवले असेल, याची मी कल्पना करू शकत नाही. पण एका गोष्टीची मला खात्री होती, विद्यार्थ्यांकडे पाहण्याची शिक्षकांची नजर आणि त्यांच्यातील गुण ओळखण्याची क्षमता विलक्षण असते. याची प्रचीती मला २९ सप्टेंबरच्या रात्री आली.
कार्यक्रमासाठी मी एक दिवस आधीच गावी आलो होतो. कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी, म्हणजे २९ सप्टेंबरला रात्री मी शाळेत गेलो. तिथे चहा-पाण्याचा कार्यक्रम सुरू होता. मी थोड्या अंतरावरून पाहिले, हेड सर गावातील नागरिकांशी बोलण्यात व्यस्त होते. त्यांच्याकडे जाऊन भेटावे की नाही, हा प्रश्न अजूनही मनात होता. इतक्या वर्षांनंतर समोर जाऊन उभे राहण्याचा संकोच काही केल्या दूर होत नव्हता.
शेवटी थोडी हिंमत केली आणि सरांकडे गेलो.
मित्रांनो, तुम्हाला सांगतो, त्या क्षणी सरांना भेटल्यावर माझ्या जन्माचे सार्थक झाल्यासारखे वाटले. मी त्यांच्या जवळ गेलो आणि नमस्कार केला. सरांनी अतिशय आपुलकीने मला जवळ घेतले. पुन्हा एकदा माझ्या खांद्यावर हात ठेवला. त्यानंतर तिथे जमलेल्या गावकऱ्यांसमोर आणि माजी विद्यार्थ्यांसमोर माझी ओळख करून देताना ते म्हणाले,
“हा माझा विद्यार्थी उजास.”
त्या वेळी माझ्या जवळ आपल्याच शाळेचे माजी विद्यार्थी प्रशांत महाजन होते. ते पुण्यात स्वतःचा व्यवसाय चालवतात. आम्हा दोघांकडे पाहून सर म्हणाले,
“ही दोघेही मुले आपली राष्ट्रीय संपत्ती आहेत. हा प्रशांत स्वतःचा व्यवसाय चालवतो. आणि हा उजास इतके उत्कृष्ट लिखाण करतो की मला त्याच्याकडे मराठीचे ट्यूशन लावावे लागतील. इतके छान मराठीवर प्रभुत्व आहे याचे!”
हे शब्द ऐकताच माझ्या डोळ्यांत पाणी आले. मी पुन्हा एकदा सरांच्या पाया पडलो. सरांनी मला प्रेमाने मिठी मारली.
एकेकाळी दहावीच्या परीक्षेत मराठी विषयात अवघे १४ गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्याबद्दल त्याच शाळेच्या हेड सरांनी आज असे कौतुकाचे उद्गार काढावेत, हा माझ्यासाठी अविश्वसनीय क्षण होता. क्षणभर मला काय बोलावे, हेच सुचले नाही. मनातून एकच भावना उमटत होती, मी धन्य झालो!
मी सरांना म्हणालो,
“सर, तुम्ही एक महाग्रंथ आहात. तुमच्या ज्ञानातून आज बाहेर पडलेले विद्यार्थी स्वतःमध्ये एक ज्ञानसंपन्न पुस्तक आहेत.”
माझे हे उत्तर ऐकताच सर तिथे जमलेल्या सर्वांना उद्देशून म्हणाले,
“मी म्हटलं होतं ना, हा मला बोलण्यात जिंकू देणार नाही!”
सर्वांच्या उपस्थितीत झालेल्या या संवादाने वातावरणात एक वेगळाच आनंद निर्माण झाला. त्या दिवशी सरांसोबत बराच वेळ गप्पा मारल्या. जुन्या आठवणींना उजाळा दिला. दुसऱ्या दिवशी सर खूप व्यस्त असतील, याची मला कल्पना होती. त्यामुळे त्यांच्या सहवासात मनसोक्त वेळ घालवण्याची हीच एक उत्तम संधी होती.
त्यानंतर रात्री सोनवणे सरांसोबतही काही वेळ गप्पा रंगल्या. आर. डी. पाटील सर भेटले, के. पी. चौधरी सर भेटले. त्यांच्यासोबतही अनेक विषयांवर गप्पा झाल्या. बऱ्याच वर्षांनंतर आपल्या गुरुजनांसोबत असा मनमोकळा संवाद साधता आला, याचे विलक्षण समाधान मनाला लाभले.
रात्री घरी परतल्यानंतर हेड सरांसाठी एक लेख लिहावा आणि त्या लेखातून त्यांना सेवापूर्तीच्या शुभेच्छा द्याव्यात, अशी भावना मनात आली. मी लिहायला बसलो.
कुठून आणि कशी सुरुवात करावी, यासाठी मला फारसा विचार करावा लागला नाही. मनात साठलेले विचार आपोआप शब्दरूप घेऊ लागले. एकामागून एक शब्द मनातून उमटत गेले आणि मोबाईलच्या नोटपॅडवरील स्क्रीनवर उतरू लागले.

आदरणीय हेड सर,
(जी. एल. पाटील सर)
आपणास मनःपूर्वक अभिवादन…

शिक्षक कधीच निवृत्त होत नाही…
शिक्षक कधीच निवृत्त होत नाही आणि होऊही शकत नाही.
तुम्ही कधी ऐकले आहे का, सूर्य आपल्या प्रकाशदानाच्या कार्यातून मुक्त झाला आहे? चंद्राने आपल्या शीतलतेचा वर्षाव करणे कधी थांबवले आहे? एखाद्या वृक्षाने फुले, फळे आणि सावली देण्याची आपली सेवा कधी थांबवली आहे? नदीने आपले गोड, अमृतासमान जल वाहवणे कधी थांबवले आहे?
नाही.
कारण देणे हा त्यांच्या अस्तित्वाचा स्वभाव आहे.
अगदी त्याचप्रमाणे, ज्ञानाने समृद्ध आणि अनुभवाने परिपूर्ण असलेला शिक्षक ज्ञानदानाच्या सेवेतून कधीच मुक्त होऊ शकत नाही. त्याच्या ज्ञानाला निवृत्ती नसते; त्याच्या संस्कारांना विराम नसतो आणि विद्यार्थ्यांच्या जीवनात त्याने प्रज्वलित केलेल्या विचारांच्या ज्योतीला अस्त नसतो.
शिक्षक हा केवळ एका विद्यार्थ्याच्या जीवनाचा नव्हे, तर संपूर्ण समाजाच्या जडणघडणीचा कणा असतो. कोणीही जन्मतः डॉक्टर, इंजिनिअर, वकील, अधिकारी, शास्त्रज्ञ, राजकीय पुढारी किंवा शिक्षक होऊन जन्माला येत नाही. प्रत्येकाला घडावे लागते; आणि त्या घडण्याच्या प्रक्रियेला विचारांची दिशा, ज्ञानाची शिदोरी आणि संस्कारांची बैठक देणारा हात म्हणजे शिक्षकाचा हात.
शिक्षक स्वतः एक ज्ञानरूपी महाग्रंथ असतो. त्या महाग्रंथातून घडणारे असंख्य विद्यार्थी म्हणजे ज्ञानाने, विचारांनी, संस्कारांनी आणि मार्गदर्शनाने समृद्ध झालेली जिवंत पुस्तके असतात. काळ पुढे सरकतो, पिढ्या बदलतात; पण त्या पुस्तकांतील ज्ञान आणि संस्कार पुढे प्रवाहित होत राहतात. त्याच पुस्तकांमधून पुन्हा काहीजण तुमच्यासारखेच ज्ञानरूपी महाग्रंथ बनतात आणि पुढील पिढीच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश प्रज्वलित करतात. अशा रीतीने ज्ञानाची ही परंपरा, संस्कारांचा हा वारसा आणि विचारांचा हा प्रकाश एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे निरंतर प्रवाहित होत राहतो. हे चक्र कालही सुरू होते, आजही सुरू आहे आणि उद्याही असेच अविरत सुरू राहणार आहे.
मनुष्य ज्ञान घेऊन जन्माला येत नाही; पण ज्ञानाच्या प्रकाशाने समृद्ध होऊन जीवन जगू शकतो आणि ज्ञानी होऊन या जगाचा निरोप घेऊ शकतो. एखाद्या शिक्षकाच्या जीवनकार्याची यापेक्षा मोठी सार्थकता आणखी कोणती असू शकते?
म्हणूनच शिक्षकासाठी ‘निवृत्ती’ हा केवळ सेवाकाळाचा शब्द असू शकतो; ज्ञानदानाच्या धर्माचा नाही.
माझ्या जीवनाला खरा अर्थ देणारे शिक्षक, गुरु आणि मार्गदर्शक म्हणून आपल्या प्रदीर्घ ज्ञानसेवेच्या कार्याला मनःपूर्वक अभिवादन!
आपण दिलेल्या ज्ञानाचा आणि संस्कारांचा ठसा आपल्या विद्यार्थ्यांच्या जीवनावर सदैव उमटत राहो. आपल्या हातून असेच असंख्य विद्यार्थी घडत राहोत आणि आपल्या ज्ञानाची ज्योत एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे अखंड तेवत राहो.
माता सरस्वती आपणास उदंड, निरामय आणि अर्थपूर्ण आयुष्य प्रदान करो, हीच निर्मळ भावना आणि मनःपूर्वक शुभेच्छा आपल्या चरणी अर्पण करतो.


आपलाच विद्यार्थी,
उजास एकनाथ महाजन
१९९४–१९९५

३० सप्टेंबरचा दिवस उजाडला. सकाळपासूनच कार्यक्रमाची लगबग सुरू झाली. आज शाळेत जायचे होते. तयारी झाल्यावर आम्ही सर्व मित्र शाळेकडे निघालो.
बऱ्याच वर्षांनंतर जुने मित्र आणि मैत्रिणी भेटत होते. त्याचबरोबर सध्या शाळेत शिकणारे विद्यार्थीही भेटले. सर्वांशी बोलताना खूप छान वाटत होते. जुन्या आठवणी, नव्या ओळखी आणि शाळेच्या परिसरात पुन्हा एकदा एकत्र आलेले विद्यार्थी, या सगळ्यामुळे मनाला विलक्षण आनंद मिळत होता.
कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी हेड सरांना पुन्हा एकदा भेटावे आणि स्वतः त्यांना शुभेच्छा द्याव्यात, असे मनात आले. स्टेजजवळ सरांकडे पाहिले, तर ते काही अतिथी, पाहुणे आणि माजी विद्यार्थ्यांसोबत बोलत होते. गर्दी थोडी कमी झाल्यासारखी वाटली, म्हणून मी सरांकडे गेलो. पण तेवढ्यात पुन्हा गर्दी वाढली.
आता तुम्हाला सांगतो, कदाचित हे ऐकून अतिशयोक्ती वाटेल; पण मी जे सांगतो आहे, ते अगदी खरे आहे.
मला येताना पाहून सरांनी स्वतःहून मला जवळ बोलावून घेतले. त्या वेळी हेड सरांसोबत प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त शिक्षणाधिकारी, आदरणीय श्री. नीलकंठ गायकवाड सर उपस्थित होते. त्यांना सर्वजण आदराने आणि प्रेमाने ‘आप्पासाहेब’ म्हणत असत. हेड सरांनी त्यांच्याशी माझी ओळख करून दिली आणि म्हणाले,
“हा माझा विद्यार्थी उजास. इतके उत्तम लिखाण करतो की वाचणाऱ्याच्या डोळ्यांत पाणी आल्याशिवाय राहत नाही.”
त्यानंतर हेड सरांनी आप्पासाहेबांना उद्देशून आणखी एक गोष्ट सांगितली,
“सर, तुम्ही उजासने लिहिलेले लेख तुमच्या भाषणात वापरा. इतके प्रभावी आहेत.”
हे शब्द ऐकून पुन्हा एकदा माझ्या डोळ्यांत पाणी आले. त्या क्षणी माझ्याकडे बोलण्यासाठी शब्दच नव्हते. मी काहीही बोललो नाही. आमच्या सर्वांसोबत फोटो काढण्यात आले. त्यानंतर हेड सरांनी माझ्यासोबत स्वतंत्रपणे एक फोटो काढला आणि म्हणाले,
“तू जर उद्या मोठा लेखक झाला तर मला तुझ्यासोबत फोटो काढायला मिळणार नाही आणि ही माझ्यासाठी एक संधी आहे.”
सरांच्या या बोलण्यातून त्यांच्या स्वभावातील नम्रता आणि मोठेपणा पुन्हा एकदा जाणवला. इतक्या मोठ्या पदावर आणि इतक्या प्रदीर्घ अनुभवाच्या टप्प्यावर पोहोचलेली व्यक्ती एका विद्यार्थ्याला इतक्या आपुलकीने आणि आदराने वागवते, ही गोष्ट माझ्यासाठी आणखी एक शिकवण होती.
मी सरांना नमस्कार केला, त्यांना सेवापूर्तीच्या शुभेच्छा दिल्या आणि बाजूला झालो. माझ्यासारखेच अनेक विद्यार्थी सरांना भेटण्यासाठी वाट पाहत उभे होते.
कार्यक्रम सुरू झाला. सर्व मान्यवरांची भाषणे झाली. शेवटी सर उपस्थित विद्यार्थी, माजी विद्यार्थी आणि सर्व अतिथींना संबोधित करण्यासाठी उभे राहिले.
सरांनी आपल्या भाषणाची सुरुवात १९९१ पासून केली. शाळेतील पहिल्या शिक्षकपदासाठी दिलेल्या मुलाखतीपासून त्यांनी आपल्या प्रवासाला उजाळा दिला. शाळेसोबतचा त्यांचा प्रदीर्घ सहवास, शाळेने दिलेले प्रेम, आपुलकी आणि विद्यार्थ्यांमध्ये दिसणाऱ्या भविष्याच्या शक्यता, या सगळ्यांचे प्रतिबिंब त्यांच्या प्रत्येक शब्दातून जाणवत होते.
आपल्या आयुष्याचा मोठा भाग ज्या शाळेसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी दिला, त्या शाळेविषयी आणि विद्यार्थ्यांविषयी त्यांच्या मनात किती जिव्हाळा आहे, याची जाणीव त्यांच्या भाषणातून होत होती.
भाषणाच्या शेवटी सरांनी उद्यापासून मुख्याध्यापकपदाची जबाबदारी स्वीकारणाऱ्या शिक्षकांचे नाव जाहीर केले. ते नाव होते माझे पहिले वर्गशिक्षक आणि मराठीचे शिक्षक, आदरणीय श्री. दिलीप सोनवणे सर!
हे नाव ऐकताच मला स्वतःबद्दल खूप अभिमान वाटला. माझे सर आता शाळेचे मुख्याध्यापक होणार होते.
खरे सांगायचे तर सोनवणे सर उद्यापासून मुख्याध्यापक होणार आहेत, याची मला अजिबात कल्पना नव्हती. माझ्या दृष्टीने त्यांच्यासारखा दुसरा व्यक्ती आणि शिक्षक त्या पदासाठी योग्य असूच शकत नव्हता.
कार्यक्रम संपला. रात्री हेड सरांसाठी आयोजित केलेली भव्य मिरवणूक निघाली. गावातील प्रत्येक व्यक्ती, मग ती लहान असो वा मोठी, वयोवृद्ध असो, स्त्री असो वा पुरुष, सर्वजण सरांच्या स्वागतासाठी उपस्थित होते. ठिकठिकाणी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. गावाने एकत्र येऊन अशी अविस्मरणीय मिरवणूक काढली की, तिच्यातून सरांप्रती असलेले प्रेम आणि कृतज्ञता मनापासून व्यक्त होत होती.
सर्व कार्यक्रम आटोपल्यानंतर मी पुन्हा घरी गेलो आणि माझे नोटपॅड उघडले. आता वेळ होती आदरणीय सोनवणे सरांना शुभेच्छा देण्याची.
पुन्हा एकदा सुरुवात कशी करावी, याचा विचार करावा लागला नाही. मनातले विचार आपोआप शब्दरूप घेऊ लागले. त्या क्षणी माझ्या मनात उमटलेले शब्द मी नोटपॅडवर उतरवत गेलो.
आदरणीय सोनवणे सर,
रा. आ. महाजन माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापकपदाची नवी धुरा हाती घेतल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन!
आपल्या या नव्या ज्ञानमय वाटचालीस मनःपूर्वक अभिष्टचिंतन!
आज सकाळी जेव्हा मी आकाशाकडे पाहिले, तेव्हा ते निरभ्र दिसले. सूर्य नेहमीप्रमाणेच उगवला होता, त्याच तेजाने, त्याच प्रखरतेने आणि त्याच निःस्वार्थ भावनेने संपूर्ण विश्वाला प्रकाश देत.
पण आज त्या उगवत्या सूर्याकडे पाहताना मनात एक वेगळाच विचार आला… काल जणू मावळत्या सूर्याने आपल्या अस्तित्वाची, प्रकाशाची आणि जबाबदारीची मशाल आज उगवणाऱ्या सूर्याच्या हाती सोपवताना सांगितले होते…
आता हे सारे विश्वच तुझे,
तूच त्याचा माय-बाप…
तुझ्यातली धगधगती मशाल
ज्ञानाचा सूर्य होऊन तळपू दे;
तुझ्यातून जन्मणाऱ्या प्रत्येक ताऱ्याला
पुन्हा सूर्य होण्याची वाट मिळू दे…
तुझ्या अस्ताची सांजही
उद्याच्या सूर्यांची पहाट ठरू दे…

हाच निर्धार मनाशी बाळगून रा. आ. महाजन माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापकपदाची धुरा हाती घेताना, मावळत्या ज्ञानसूर्याने उगवत्या ज्ञानसूर्याच्या हाती सोपवलेली ही ज्ञानाची मशाल आपण समर्थपणे पुढे न्याल, याची मनापासून खात्री वाटते.
आपल्या ज्ञानमंदिराची, आपल्या मुला-मुलींची, आपल्या विद्यार्थ्यांची आणि त्यांच्यातून घडणाऱ्या आपल्या गावाच्या उज्ज्वल भविष्याची वाटचाल अधिक प्रकाशमान व्हावी, या नव्या प्रवासाची जबाबदारी आज आपण स्वीकारत आहात.
आणि या क्षणी माझ्यासाठी हा प्रसंग केवळ एका मुख्याध्यापकाच्या पदग्रहणाचा नाही; तो माझ्यासारख्या एका विद्यार्थ्याच्या मनात वर्षानुवर्षे जपलेल्या गुरुऋणाला शब्द देण्याचा क्षण आहे.
विद्यार्थ्यांचे लाडके आणि माझे गुरू, आदरणीय सोनवणे सर, ज्यांनी मला मराठी वाचायला, लिहायला आणि तिच्याशी मनापासून नाते जोडायला शिकवले… ज्यांनी माझ्या मनात मराठी भाषेविषयीची अस्मिता रुजवली. आज मी हे जे काही तोडक्या-मोडक्या शब्दांत लिहित आहे, त्या शब्दांना दिशा देणाऱ्या माझ्या लेखणीच्या मुळाशी ज्यांची शिकवण आहे, ते माझे पहिले वर्गशिक्षक, माझे मराठीचे शिक्षक.
“इयत्ता” या एका शब्दापासून सुरू झालेल्या माझ्या शालेय प्रवासाचे खरे शिल्पकार म्हणजे आदरणीय सोनवणे सर.
त्या वेळी कदाचित आपल्या शिकवणीचे मोल पूर्णपणे जाणवले नसेल; पण काळ पुढे गेला, शाळा मागे राहिली, वर्ग बदलले, वह्या-पुस्तके बंद झाली… तरी आपल्या शिकवणीचे काही शब्द मनात तसेच राहिले. आज मागे वळून पाहताना जाणवते की, त्या शब्दांनी केवळ एका विषयाची ओळख करून दिली नव्हती; त्यांनी भाषेशी नाते जोडले, विचारांना दिशा दिली आणि मनात मराठीची अस्मिता रुजवली.
आज आपण आपल्या आयुष्यातील एक अत्यंत महत्त्वाचे पद आणि त्यासोबत येणारी तितकीच मोठी जबाबदारी स्वीकारत आहात. ही जबाबदारी जरी गोवर्धनासारखी विशाल असली, तरी आपल्याविषयी आम्हा सर्वांच्या मनात असलेला विश्वास त्याहून मोठा आहे. आपण ही ज्ञानाची धुरा आपल्या अनुभवाने, विवेकाने आणि मायेने समर्थपणे पेलाल, याची खात्री आहे.
आपल्या या नव्या प्रवासासाठी माता सरस्वती आपल्या ज्ञानाची, विवेकाची आणि कर्तृत्वाची ज्योत अधिक तेजस्वी ठेवो; आपल्या हाती आशीर्वादरूपी कृपाप्रसाद देवो, हीच तिच्या चरणी मनःपूर्वक प्रार्थना.
पुन्हा एकदा, आदरणीय सोनवणे सर,
आपणांस मुख्याध्यापकपदाच्या नव्या जबाबदारीसाठी मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन!
आपल्या या नव्या भूमिकेकडे पाहताना माझ्या मनात एकच भावना आहे,
ज्यांनी माझ्या शालेय आयुष्याच्या पहिल्या पानावर “इयत्ता” हा शब्द लिहिला, तेच आज माझ्या शाळेच्या भविष्याच्या पुढच्या अध्यायाची सुरुवात करत आहेत.
यापेक्षा एका विद्यार्थ्याच्या मनाला अभिमान देणारा आणि गुरुऋणाची जाणीव करून देणारा क्षण आणखी कोणता असू शकतो?

आपलाच विद्यार्थी,
उजास एकनाथ महाजन
१९९४–१९९५

मी माझ्या लिखाणात अनेकदा संदर्भ म्हणून काही काव्यपंक्ती किंवा ओळींचा वापर करत असतो. पण त्या दिवशी या दोन्ही लेखनांमध्ये काव्यपंक्ती तयार करण्यासाठी मला अजिबात वेळ लागला नाही. त्या सहजपणे मनातून उमटल्या. हा एक चमत्कारच म्हणावा लागेल.
ज्यांच्याकडून मी मराठी शब्दांची आणि भाषेची फुले वेचायला शिकलो, त्यांच्यासाठीच आज फुलांच्या रूपात शब्दसुमने अर्पण करताना शब्दांची कमतरता जाणवली नाही. उलट, मनातले विचार इतक्या सहजपणे शब्दांत उतरले की, ते सारे त्यांच्या शिकवणीचे आणि आशीर्वादाचेच फलित आहे, असे मला मनापासून वाटले.
ज्या शिक्षकांनी कधीकाळी माझ्या हातात अक्षरांची ओळख करून दिली, त्यांच्याच शिकवणीने आज माझ्या लेखणीला शब्दांची समृद्धी दिली होती. आणि त्या शब्दांच्या माध्यमातून त्यांच्याप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मला मिळाली होती.

Share This Post

ब्लॉग वाचा

प्रतिक्रिया व्यक्त करा

एक विचार, एक संवाद हे केवळ साहित्यलेखनाचे व्यासपीठ नसून, विचारांच्या देवाणघेवाणीतून आत्मचिंतन आणि परिवर्तनाची दिशा शोधण्याचा हा माझा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.

साहित्याच्या माध्यमातून जीवन, समाज, संस्कार आणि मानवी मूल्यांचा शोध घेत वाचक-रसिकाला स्वतंत्रपणे विचार करण्यास प्रवृत्त करणे, हा या व्यासपीठाचा प्रमुख उद्देश आहे.

कारण, विचार व्यक्तीपासून सुरू होतो, संवादातून समृद्ध होतो आणि कृतीतून परिवर्तन घडवू शकतो, हा माझा विश्वास आहे.