शाळा सोडून आज प्रदीर्घ काळ लोटला आहे…

वय वाढत गेले, आयुष्य पुढे सरकत गेले. या प्रदीर्घ प्रवासात सुख-दुःखांचे, यश-अपयशांचे आणि आशा-निराशांचे अनेक चढ-उतार अनुभवले. नामांकित महाविद्यालये आणि विद्यापीठांत शिक्षण घेण्याची संधी मिळाली. ज्ञानाच्या अनेक नव्या वाटा धुंडाळल्या आणि जगण्याचे अनेक अर्थ उलगडत गेले.

पण या सगळ्या प्रवासात मनाच्या एका कोपऱ्यात एक जग मात्र आजही तितकेच जिवंत आहे.
माझ्या शाळेचे जग… माझ्या बालपणाचे जग… माझ्या त्या निरागस आठवणींतले जग!

दहावीपर्यंतच्या त्या आयुष्यात फार काही नव्हते…
ना मोठेपणाचा आव, ना पैशाचा गर्व, ना दिखावा, ना चढाओढ, ना मीपणाचा अहंकार, ना जात-पात, ना प्रतिष्ठेच्या भिंती…
होते फक्त निखळ आपलेपण, निर्मळ प्रेम, मनापासूनचा सहवास, खळखळून हसणारे क्षण आणि आयुष्यभर पुरतील अशा गोड आठवणी.
आणि होती निखळ मैत्री!

शाळा सुटली आणि आयुष्याची वाट बदलली. माणसांचे जग मोठे झाले, जबाबदाऱ्या वाढल्या, धावपळ वाढली. हळूहळू ‘आपले’ आणि ‘परके’, ‘माझे’ आणि ‘तुझे’ यांचे अर्थ समजू लागले. जगण्याच्या व्यवहारात आपण गुंतत गेलो आणि नकळत शाळेच्या त्या निरागस दिवसांवर काळाची धूळ साचत गेली.

पण शाळेसाठी असणारी मनाची ओढ मात्र कधीच कमी झाली नाही.
आयुष्याच्या घड्याळाचे काटे आपल्या इच्छेप्रमाणे थांबत नाहीत.
म्हणूनच आजचा दिवस माझ्यासाठी खरोखरच भाग्याचा आहे.
या समूहाच्या माध्यमातून का होईना, आज पुन्हा एकदा त्या आठवणींच्या विश्वात आणि आपल्या गुरुजनांच्या सान्निध्यात परतण्याचे भाग्य लाभले आहे.

आयुष्याच्या धावपळीत अनेकदा मनात आले की, ज्यांनी आपल्याला घडवले, त्यांच्या ऋणाची जाणीव त्यांना करून द्यावी आणि त्यांच्या चरणी कृतज्ञतेचे दोन शब्द अर्पण करावेत.

पण ती वेळ कधी आली नाही.

कदाचित काही ऋणे फेडण्यासाठी नसतातच, ती आयुष्यभर हृदयात जपायची असतात.

आज शिक्षक दिनाच्या निमित्ताने माझ्या आयुष्यात कधी ना कधी ज्ञानाचा दीप प्रज्वलित करणाऱ्या, विचारांना दिशा देणाऱ्या, संस्कारांची शिदोरी देणाऱ्या आणि माणूस म्हणून घडवणाऱ्या माझ्या सर्व गुरुजनांना मनःपूर्वक वंदन करतो. मनात साठून राहिलेल्या कृतज्ञतेला आज शब्दरूप देण्याचा हा प्रयत्न आहे.

‘इयत्ता’ या एका छोट्याशा शब्दापासून सुरू झालेल्या माझ्या आयुष्याच्या खऱ्या प्रवासाचे शिल्पकार म्हणजे माझे गुरुजन.
अक्षरांपासून विचारांपर्यंत, ज्ञानापासून विवेकापर्यंत आणि शिक्षणापासून जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनापर्यंत आपण मला केवळ शिकवले नाही, तर घडवले.

चुका झाल्या तेव्हा त्यांतून शिकण्याची ताकद दिली, अडचणी आल्या तेव्हा न डगमगता उभे राहण्याचे बळ दिले आणि आयुष्याच्या प्रत्येक वळणावर स्वतःचा मार्ग शोधण्याची क्षमता दिली.

आज मागे वळून पाहताना जाणवते की, आपण शिकवलेले धडे पुस्तकांच्या पानांपुरते मर्यादित राहिले नाहीत, तर ते माझ्या आयुष्याच्या प्रत्येक पानावर उमटत गेले.

आयुष्याच्या या रणांगणात कधी परिस्थितीने प्रश्न विचारले, कधी अपयशाने खचवले, तर कधी यशामुळे भरकटण्याची शक्यता निर्माण झाली. अशा प्रत्येक वेळी आपल्या शिकवणीचे संस्कार अंतर्मनातून जागे झाले.

आणि तेव्हा जाणवले की, आपण केवळ शिक्षक नव्हतात, तर आमच्या जीवनरथाचे श्रीकृष्णरूपी सारथी होतात.
हाती लगाम देऊन रथ स्वतः चालवणारे नव्हे, तर योग्य क्षणी दिशा दाखवून स्वतःचा रथ स्वतः चालवण्याचे सामर्थ्य देणारे.

आज मी आयुष्यात ज्या टप्प्यावर उभा आहे, त्यात माझ्या प्रयत्नांचा वाटा निश्चितच आहे. पण त्या प्रयत्नांना दिशा देणारे मार्गदर्शक विचार, मनाला आधार देणारे संस्कार आणि पडल्यावर पुन्हा उभे राहण्याचे बळ मला माझ्या गुरुजनांकडून मिळाले आहे.

म्हणूनच आजच्या या दिवशी माझ्याकडे देण्यासाठी मोठे काही नाही.

फक्त मनापासून उमटलेले काही शब्द आहेत…
आपण दिलेले ज्ञान ही माझ्या आयुष्याची शिदोरी आहे.
आपण दिलेले संस्कार ही माझी खरी ओळख आहे.
आणि आपण माझ्यावर ठेवलेला विश्वास ही माझ्या प्रवासाची अदृश्य ताकद आहे.

आपल्या चरणी कृतज्ञतेने नतमस्तक…
मनापासून मानाचा मुजरा! 🙏

माझ्या सर्व गुरुजनांना शिक्षक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

Share This Post

प्रतिक्रिया व्यक्त करा

एक विचार, एक संवाद हे केवळ साहित्यलेखनाचे व्यासपीठ नसून, विचारांच्या देवाणघेवाणीतून आत्मचिंतन आणि परिवर्तनाची दिशा शोधण्याचा हा माझा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.

साहित्याच्या माध्यमातून जीवन, समाज, संस्कार आणि मानवी मूल्यांचा शोध घेत वाचक-रसिकाला स्वतंत्रपणे विचार करण्यास प्रवृत्त करणे, हा या व्यासपीठाचा प्रमुख उद्देश आहे.

कारण, विचार व्यक्तीपासून सुरू होतो, संवादातून समृद्ध होतो आणि कृतीतून परिवर्तन घडवू शकतो, हा माझा विश्वास आहे.

Is this your new site? Log in to activate admin features and dismiss this message
लॉगीन